NGN News
Latest Marathi News

गोंदेश्वर मंदिर दुरुस्तीसाठी १० कोटी; खा. वाजेंच्या पाठपुराव्याला यश

  • शिखर, नंदी मंडपाच्या दुरुस्तीसह अनेक विकासकामांचा मार्ग मोकळा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सिन्नर : सिन्नरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या १२व्या शतकातील गोंदेश्वर मंदिराच्या संवर्धन आणि परिसर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. मंदिराच्या जतनासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्तीपासून भाविकांसाठीच्या सुविधांपर्यंत विविध उपाययोजनांची माहिती विभागाचे महासंचालक यादविर सिंह रावत यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या पत्रातून दिली आहे.

गोंदेश्वर मंदिराच्या शिखरासह नंदी मंडप आणि मुख्य मंदिराच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी तांत्रिक अंदाजपत्रक अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कामे आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये हाती घेण्यात येणार असल्याचे ASI ने स्पष्ट केले आहे. या संवर्धन कामांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) ₹१० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, निधीची औपचारिक प्राप्ती अद्याप प्रलंबित असल्याचेही विभागाने नमूद केले आहे.

गोंदेश्वर मंदिराचे प्रमुख आकर्षण असलेल्या सूर्याभिषेकाच्या वैशिष्ट्याचे संरक्षण करण्यासाठी मंदिर परिसरातील बांधकामांवर कायद्यानुसार नियंत्रण ठेवले जाणार आहे. मंदिराच्या संरक्षित हद्दीपासून १०० मीटरचा प्रतिबंधित परिसर आणि त्यापुढील २०० मीटरचा नियंत्रित परिसर यातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. प्रतिबंधित क्षेत्रात नवीन बांधकामांना परवानगी नसून, नियंत्रित क्षेत्रात संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. मंदिराचे ऐतिहासिक दृश्यवैभव आणि सूर्याभिषेकाशी संबंधित खगोलीय संरेखन अबाधित ठेवण्याची भूमिका ASI ने स्पष्ट केली आहे.

तसेच, मंदिर परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी, बाके आणि कचरापेट्या यांसारख्या मूलभूत सुविधांची नियमित देखभाल केली जात आहे. याशिवाय पायवाटा, पाणीपुरवठा आणि परिसर सुशोभीकरणाच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली आणि सूर्याभिषेकाचे वैशिष्ट्य यांची माहिती देणारे सांस्कृतिक माहिती फलक उभारण्यासही चालू आर्थिक वर्षासाठी मंजुरी मिळाली आहे. मंदिर परिसरातील व्यावसायिक हालचालींवर नियंत्रण ठेवून स्थळाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

आता प्रत्यक्ष कामांच्या अंमलबजावणीकडे लक्ष
गोंदेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून महाराष्ट्राच्या मध्ययुगीन स्थापत्यकलेचा महत्त्वपूर्ण वारसा आहे. त्यामुळे मंदिराच्या संवर्धनासाठी प्रस्तावित कामे वेळेत सुरू होणे, निधी प्रत्यक्ष उपलब्ध होणे आणि कामांचा दर्जा कायम राखणे या बाबींना विशेष महत्त्व आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्याला मिळालेल्या या प्रतिसादामुळे मंदिराच्या संवर्धनाबाबत आशा निर्माण झाली असली, तरी ₹१० कोटींच्या निधीची प्रत्यक्ष प्राप्ती आणि दुरुस्तीच्या कामांची सुरुवात हे पुढील महत्त्वाचे टप्पे असतील. सिन्नरच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या कामांची प्रभावी अंमलबजावणी भारतीय पुरातत्व विभागाकडून होणे अपेक्षित आहे.

—

“गोंदेश्वर मंदिर हा सिन्नरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाचा अमूल्य ठेवा आहे. या मंदिराचे मूळ स्थापत्यवैभव, सूर्याभिषेकाचे वैशिष्ट्य आणि ऐतिहासिक वारसा जतन होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत असून, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिलेला सकारात्मक प्रतिसाद महत्त्वाचा आहे. मात्र, केवळ आश्वासनांपुरते न थांबता मंजूर निधी प्रत्यक्ष उपलब्ध होऊन संवर्धनाची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील.” : राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

Comments are closed.