NGN News
Latest Marathi News

आयमा अध्यक्षांच्या मागण्यांना उद्योगमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

  • आ.गीते यांच्या पुढाकाराने अंबडसह जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला ‘काँक्रीट’ बळ

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला भेडसावणाऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रश्नांना आता गती मिळण्याचे संकेत आहेत. अंबड-सातपूरमधील सांडपाणी व्यवस्थापनापासून अंबडच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण,आक्राळे येथे फायर स्टेशन, सिन्नरच्या रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी आणि नव्या औद्योगिक वसाहतींसाठी भूसंपादन अशा महत्त्वाच्या मागण्यांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार गोकूळ गीते यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांच्या सततच्या मागण्यांना या बैठकीत तत्त्वतः मंजुरी मिळाल्याने नाशिकच्या उद्योगविश्वाला मोठा दिलासा मिळाला आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी ७५ टक्के निधी महानगरपालिका व जिल्हा नियोजन समितीमार्फत, तर २५ टक्के निधी एमआयडीसीमार्फत उपलब्ध करून देण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले. उर्वरित रस्त्यांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासही मंजुरी देण्यात आली.

अमृत-२ मधून सांडपाणी व्यवस्थापन
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीतील भुयारी गटार योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमृत-२ योजनेतून निधीचे नियोजन करण्याचे ठरले. त्यामुळे उद्योग परिसरातील सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
दिंडोरी तालुक्यातील आकराळे एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक उद्योग असूनही स्वतंत्र फायर स्टेशन नसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पानसरे यांनी हा मुद्दा बैठकीत ठामपणे मांडला. त्यानंतर आक्राळे येथे फायर स्टेशन उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देत डीपीआर तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

सिन्नरच्या रस्त्यांसाठी स्वतंत्र निधी
सिन्नर औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या कामांसाठी एमआयडीसीकडून स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे सिन्नरच्या औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व पायाभूत सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

नाशिक जिल्ह्यात नव्या औद्योगिक वसाहती उभारण्यासाठी भूसंपादनाचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला. सिन्नर तालुक्यात विविध ठिकाणी जागा उपलब्ध असल्याचे आ. गोकुळ गिते यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत जिल्हाधिकारी लवकरच बैठक घेणार आहेत. तसेच राजूर-बहुला व आडवण प्रस्तावित औद्योगिक वसाहतींच्या भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने राबविण्याची मागणी पानसरे यांनी केली. बैठकीस एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील, बनसोड, लहिवाळ, संजय सानप,आ.गोकुळ गिते,आयमा अध्यक्ष राजेंद्र पानसरे,खजिनदार अविनाश बोडके आदी उपस्थित होते.

—
“नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी पायाभूत सुविधा सक्षम असणे अत्यावश्यक आहे. रस्ते, सांडपाणी व्यवस्था, अग्निसुरक्षा आणि नवीन औद्योगिक क्षेत्रांसाठी उपलब्ध होणारी जमीन हे उद्योगांच्या वाढीचे मूलभूत आधार आहेत. या प्रश्नांसाठी आईमा च्या वतीने आमदार गोकुळजी गीते यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या मागण्यांची सकारात्मक दखल घेत तत्त्वतः मंजुरी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. अंबडच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण, अंबड-सातपूरची सांडपाणी व्यवस्था आणि आकराळे येथील फायर स्टेशन हे उद्योगांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. या निर्णयांची अंमलबजावणी वेळेत होणे गरजेचे आहे

राजेंद्र पानसरे
अध्यक्ष,आयमा

Comments are closed.