
* उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती बिनविरोध; व्यवसाय ५ हजार कोटींवर तर शाखाविस्तार १०१ वर नेण्याचा संकल्प
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : सहकारातील पुढारलेल्या दि नाशिक मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह अर्थात नामको बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विजय साने, तर उपाध्यक्षपदी प्रफुल्ल संचेती यांची बिनविरोध निवड झाली. साने यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी चौथ्यांदा सोपवण्यात आली आहे. बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला.
अध्यक्षपदाची जबाबदारी चौथ्यांदा मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत विजय साने यांनी बँकेच्या पुढील वाटचालीचा आराखडा स्पष्ट केला.
बँकेचा व्यवसाय ५ हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे साने यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर बँकेच्या शाखांचा विस्तार, अत्याधुनिक सेवा, स्वच्छ व पारदर्शक कारभार आणि ग्राहकाभिमुख व्यवस्थेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मावळते अध्यक्ष हेमंत धात्रक, सोहनलाल भंडारी आणि वसंत गिते यांनी नामकोच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. सभासदांनी बँकेच्या निवडणुकीत २१-० असा स्पष्ट कौल दिल्याचे त्यांनी नमूद केले. प्रशासकाच्या काळात बँकेच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, त्या परिस्थितीतून मार्ग काढत बँकेने प्रगती साधली असून मोतीराम अग्रवाल जालना मर्चंटस् को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी काळात नामकोच्या शाखांची संख्या १०१ पर्यंत नेण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यासोबत अत्याधुनिक मोबाइल बँकिंग आणि डिजिटल बँकिंग सुविधांचा विस्तार करण्यावरही भर दिला जाणार आहे. निवडीनंतरच्या स्वागत सोहळ्यास महापौर हिमगौरी आडके, आमदार सीमा हिरे, माजी महापौर बाळासाहेब सानप, उपमहापौर विलास शिंदे, सुनील केदार, अविनाश खैरनार, विजय काकड, संचालक सुभाष नहार, ललित मोदी, प्रशांत दिवे, अशोक आबा सोनजे, अॅड. आकाश छाजेड, प्रकाश दायमा यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी, सभासद आणि मान्यवर उपस्थित होते.
‘‘छोटा कामगार म्हणून सुरुवात करून मल्टिस्टेट शेड्युल्ड बँकेचे चौथ्यांदा अध्यक्षपद भूषविणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या प्रवासात तळागाळातील कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य माणसाला ठेच लागली तर आपल्या डोळ्यांत पाणी आले पाहिजे, अशा संवेदनशीलतेने काम करू,’’ – विजय साने, नूतन अध्यक्ष
Comments are closed.