NGN News
Latest Marathi News

सेवकांना सातवा वेतन आयोग देण्याचा ‘मविप्र’चा निर्णय !

  • वार्षिक सर्वसाधारण सभेत सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची घोषणा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण घोषणा मविप्रच्या ११२ व्या सर्वसाधारण सभेत सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केली. संस्थेमध्ये १० वर्षांपेक्षा अधिक काळ सेवेत असलेल्या सेवकांना १ जानेवारी २०२७ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाईल, असे सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी जाहीर केले. यासोबतच उर्वरित कर्मचाऱ्यांनाही योग्य पगारवाढ देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

मराठा विद्या प्रसारक समाज (मविप्र) संस्थेची ११२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मराठा हायस्कूलच्या कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात पार पडली. या सभेत सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी संस्थेच्या १,२२९ कोटी ३० लाख रुपयांच्या विक्रमी अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी स्वागत केले, तर सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले.

सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी

मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, मविप्र समाजाचा सन २०२५- २०२६ चा वार्षिक अहवाल वाचून मंजूर करणे,  सन २०२५- २०२६ चे मविप्र समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे व सर्व शाखांचे विभागवार एकत्रित खर्च-उत्पन्न पत्रके व ताळेबंद पत्रके यांना मंजुरी देणे, सन २०२६ – २०२७ साठी मविप्र समाजाचे मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांच्या एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणे,  सन २०२६-२०२७ साठी हिशोब तपासणीसांची नेमणूक करणे, संस्थेच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडी-अडचणींचा विचार करणे तसेच मविप्र समाजाच्या विकासासाठी आर्थिक बाबींचा विचार करणे, मविप्र समाजाच्या ध्येयधोरणांनुसार पुढील कार्याची दिशा ठरविणे, मा. अध्यक्षसाहेब यांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे, या सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. यापैकी ‘संस्थेच्या मालकीचा स.नं.६९० ‘अ’ व ‘ब’मधील फायर ब्रिगेड स्टेशनकरिता आरक्षित असलेले ८ हजार चौ.मी. क्षेत्र मनपास हस्तांतर करणेस आलेल्या पत्राबाबत निर्णय घेणे’, हा विषय क्र. ८ प्रलंबित ठेवण्यात आला असून, कायदेशीर सल्ला आणि तज्ज्ञांचे मत घेऊन या विषयाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी जाहीर केले.  

मविप्रचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, ॲड. रमेशचंद्र बच्छाव, रमेश पिंगळे, ॲड. सयाजीराव गायकवाड यांनी विषयांचे वाचन केले. शिक्षणाधिकारी डी. डी. जाधव यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. सभेस संस्थेचे संचालक शिवाजी गडाख, रवींद्र देवरे, कृष्णाजी भगत, प्रवीण जाधव, नंदकुमार बनकर, विजय पगार, डॉ. प्रसाद सोनवणे, अमित बोरसे, महिला सदस्य शोभा बोरस्ते, शालन सोनवणे, सेवक सदस्य प्रा. सी. डी. शिंदे, जगन्नाथ निंबाळकर यांच्यासह माजी सरचिटणीस निलिमा पवार, माजी अध्यक्ष तुषार शेवाळे, अरविंद कारे, माणिकराव बोरस्ते, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, नाना महाले, निवृत्त पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, भाऊसाहेब खताळे, पुंडलिक थेटे, नानासाहेब दाते, राजेंद्र मोगल, विजय गडाख आदींसह जिल्हाभरातील हजारो सभासद, हितचिंतक, मविप्र शिक्षणाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

@ ११२ वर्षांची परंपरा असलेल्या मविप्र संस्थेची आजची वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सर्व विषय एकमताने मंजूर झाले. सर्वांना बोलण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांचे मी आभार मानतो. सर्व आजी-माजी पदाधिकारी, सभासद, सेवक, हितचिंतक यांचेही मी मनापासून आभार मानतो. यापुढेही सर्वांचे असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र समाज, नाशिक.

विद्यापीठ निर्णय रद्दबातल हा सभासदांचा विजय : पवार

दरम्यान, माविप्र खाजगी विद्यापीठाला असणाऱ्या विरोधामुळे सत्ताधाऱ्यांना ते रद्द करावे लागले, हा सभासदांचा मोठा विजय असल्याचे माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी संस्थेमधील अनागोंदी, बिघडत चाललेली शिस्त, गुणवत्ता, विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न, प्राध्यापक भरतीत नियोजन नसल्याने कमी झालेल्या 78 जागा, समाजाचा वार्षिक अहवालात दिवंगत अजितदादा पवार यांचा श्रद्धांजली फोटो न छापणे, उदाजी बोर्डिंग ची 2 एकर जागेचा प्रश्न, आर्थिक विषय , मेडिकल कॉलेजमधील अनागोंदी, प्लेसमेंट सेल द्वारे दिलेल्या नोकऱ्यांमधील फसवेगिरी, मुख्यमंत्री कौशल्य व प्रशिक्षण योजनेतील भ्रष्टाचार, कर्जफेडीतील बनवेगिरी , कर्मचाऱ्यांवरील दडपशाई या व इतर अनेक प्रश्नांसंबंधी विवेचन केले.

याप्रसंगी विद्यमान अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले माजी उपसभापती पंडितराव पिंगळे, प्रणवदादा पवार, माजी संचालक दिलीप मोरे,भाऊसाहेब खतळे, हेमंत वाजे, नाना महाले, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, प्रल्हाद गडाख , दीपक काका बोरस्ते आदि उपस्थित होते.

Comments are closed.