NGN News
Latest Marathi News

‘वसाका’ पुनरुज्जीवनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; NCDC सोबत सकारात्मक चर्चा

  • कर्जप्रकरण, कायदेशीर व प्रशासकीय बाबींवर नवी दिल्लीत बैठक; आमदार डॉ. राहुल आहेर यांचा पुढाकार

** एनजीएन न्यूज नेटवर्क

सटाणा : श्रीकांत रौंदळ

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना मर्यादित (वसाका) पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी नवी दिल्ली येथील नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NCDC) कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. देवळा तालुक्याचे भाजपाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत वसाकाच्या कर्जप्रकरणासह कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

NCDC चे DMD (वित्त) मनोज कुमार बंसल यांची भेट घेऊन वसाकाची सद्यस्थिती, कर्जाशी संबंधित प्रश्न तसेच कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या संमती व परवानग्यांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी कारखाना पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक सहकार्य व परवानगी मिळावी, यासाठी NCDC कडे निवेदनही सादर करण्यात आले. बैठकीस NCDC चे डायरेक्टर (Sugar) दुबासी, डेप्युटी डायरेक्टर (Legal), असिस्टंट डायरेक्टर (Legal) तसेच लीगल डायरेक्टर उपस्थित होते. वसाकाचे विधिज्ञ ॲड. विलास देशमाने यांनीही बैठकीत सहभाग घेतला.

बैठकीत वसाका पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने कायदेशीर, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवर सकारात्मक व सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे वसाकाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढील प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वसाका सुरू झाल्यास परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच संबंधित घटकांना मोठा आधार मिळण्यासोबतच देवळा तालुक्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळू शकते. वसाका पुन्हा सुरू व्हावा, शेतकरी व कामगारांच्या हिताला बळ मिळावे आणि परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळावी, यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू राहणार आहे, असे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले.

Comments are closed.