NGN News
Latest Marathi News

डॉ. नीलेश जेजुरकर यांना जामीन नाकारला; उच्च न्यायालयाचा दणका

  • डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरण; पोलिस तपासाला महत्त्व प्राप्त

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. नाशिक न्यायालयाने यापूर्वी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर डॉ. नीलेश यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रकरणातील प्राथमिक बाबींचा विचार करून जामीन देण्यास नकार दिला. आदेशाला तीन आठवड्यांची स्थगिती देण्याची बचाव पक्षाची मागणीही न्यायालयाने फेटाळली.

डॉ. मनीषा जेजुरकर यांचा ६ मार्च २०२६ रोजी गंगापूर रोड परिसरातील त्यांच्या निवासस्थानी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून डॉ. नीलेश यांच्याविरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुनावणीदरम्यान फिर्यादी व सरकारी पक्षाने वैवाहिक वाद, मानसिक छळ, कथित विवाहबाह्य संबंध तसेच मृत्यूपूर्वी घडलेल्या काही घटनांचा उल्लेख केला. घटनास्थळाची परिस्थिती आणि मृत्यूची पद्धत याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे डॉ. मनीषा यांचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असण्याची शक्यताही तपासण्याची गरज असल्याचे गंभीर निरीक्षण न्यायालयीन सुनावणीदरम्यान समोर आले. घटनास्थळावरील परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि पोस्टमॉर्टम अहवालासंदर्भातील उपस्थित केलेले प्रश्न यामुळे तपासाची दिशा अधिक व्यापक झाली आहे. मात्र, न्यायालयाने डॉ. नीलेश जेजुरकर दोषी असल्याचा अंतिम निष्कर्ष दिलेला नाही. अटकपूर्व जामीन नाकारल्याने आता पोलिसांच्या पुढील तपासाला महत्त्व प्राप्त झाले असून, या तपासातून मृत्यूचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित होणार आहे.

Comments are closed.