
- संशयित तरुणीसह तिघांकडून फसवणूक; अंबड पोलिसांत गुन्हा दाखल
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : चाेरट्यांच्या टोळीने चक्क वाग्दत्त वधू बनून विवाहेच्छुक डॉक्टर नवरदेवाला लाखो रुपयांना चुना लावल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. चोरट्यांनी हुंडा, कपडे, मंडप व लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली तब्बल ११ लाख ८६ हजार ५६१ रुपये उकळले. ऑनलाईन मॅट्रीमोनीवरून जाळ्यात ओढून ही फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. सदर डॉक्टर डेंटल क्लिनिक चालवत आहे. विवाहासाठी वाढू संशोधन सुरु असताना त्यास गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ३९ वर्षीय पीडित डॉक्टर अंबड परिसरात कार्यरत असून ते वधूच्या संशोधनात असताना त्यासाठी त्यांनी मॅट्रीमोनी ॲपवर नोंदणी केली होती. सदर ॲपवर बनावट आयडीवरून डॉ. सायली पाटील नामक संशयित तरुणीने माेबाईलसह साेशल मिडियावरुन डॉक्टरशी संपर्क साधला. संवादादरम्यान नाशिकमधील काही डॉक्टर्सचा नामोल्लेख केल्याने पिडीत डॉक्टरचा त्या तरुणीवर विश्वास बसला. विवाह निश्चित झाल्याचे सांगत संशयित तरुणीने बनावट भाऊ आणि काका यांच्याशीही डॉक्टरकडून हुंडा, दागिन्यांचा खर्च, लग्नाचा बस्ता, मंडप आणि जेवणाचा खर्च आदींसाठी टप्प्याटप्प्याने रक्कम मागून घेतली. ही एकत्रित रक्कम ११ लाख ८६ हजार ५६१ रुपये इतकी उकलण्यात आली.
तथापि, त्यानंतर अचानक संशयित तरुणीसह तिच्या कथित भाऊ आणि काकाने संवाद बंद केला. त्यांचे मोबाईल देखील बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्टरने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी बीएनएस कलमांसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. तपास पथक संशयितांचे मोबाईल, बनावट आयडी व सीडीआर/एसडीआरचे तांत्रिक विश्लेषण करत आहेत.
Comments are closed.