
- खा. संजय राऊत, राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर धडक
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील रस्त्यांवर पडलेले जीवघेणे खड्डे, रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि त्यातून होणाऱ्या अपघातांच्या प्रश्नावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोमवारी (दि. १७) महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार जनआक्रोश मोर्चा काढला. शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात शिवसैनिकांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
शालिमार येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. विविध घोषणा देत मोर्चेकरी महापालिका मुख्यालयाच्या दिशेने रवाना झाले. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, जीवघेणे खड्डे बुजवावेत आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
खड्ड्यांमुळे मृत्यूंचा मुद्दा ऐरणीवर
शिवसेनेने या आंदोलनात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. मोर्चाच्या ठिकाणी मृत नागरिकांचे छायाचित्रे लावून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खड्ड्यांमुळे आतापर्यंत सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा शिवसेनेने केला असून, अनेक नागरिक जखमी झाल्याचेही पक्षाकडून सांगण्यात आले.
पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली असून, दुचाकीस्वार, पादचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच स्कूल व्हॅन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. खड्ड्यांमुळे दररोज अपघाताचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.
‘महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
मोर्चादरम्यान संजय राऊत यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली. नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण महापालिका प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
नाशिक शहराची पूर्वी ‘खड्डेमुक्त शहर’ अशी ओळख होती. मात्र, आज शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून नाशिकमधील खड्ड्यांची चर्चा देशभर होत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
सिंहस्थाच्या कामांवरूनही सरकारला लक्ष्य
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना मूलभूत रस्ते व्यवस्था मात्र कोलमडल्याचा आरोप शिवसेनेने केला. ‘शहरातील साधे खड्डे बुजविता येत नाहीत, मग सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी कशी केली जाणार?’ असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. सिंहस्थाच्या नावाखाली विकासकामांऐवजी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. नाशिकच्या रस्त्यांची परिस्थिती सुधारण्याला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली.
प्रतीकात्मक यमराज आणि रेडा
मोर्चाला आक्रमक स्वरूप देण्यासाठी शिवसेनेने प्रतीकात्मक यमराज आणि रेडा मोर्चात सहभागी केला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
‘महापौर आणि आयुक्तांकडे संवेदनशीलता असेल तर त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांचे निवेदन स्वीकारावे,’ असे आवाहनही राऊत यांनी केले.
प्रशासनाला जाब विचारण्याची मागणी
मोर्चानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून खड्डे बुजवावेत, रस्त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करावी, अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय करावेत आणि खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी निश्चित करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणीची कामे सुरू असताना रस्त्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी प्रशासनाला घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात खड्डे आणि रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न नाशिकच्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता आहे.
Comments are closed.