NGN News
Latest Marathi News

‘स्वयंसिद्धा’च्या ‘श्रावण सरी’ सोहळ्यात वैविध्यपूर्ण स्पर्धा, मंगळागौर खेळांचा मेळ

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : खणखणीत उखाणे.. नैसर्गिक पाना-फुलांनी केलेला पेहराव आणि ठुमकेदार नृत्याला बहारदार मंगळागौर गीत सादरीकरणाची मिळालेली जोड उपस्थितांना श्रावण सरींच्या चिंब वातावरणाची प्रचिती देऊन गेली. निमित्त होते.. स्वयंसिद्धा बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘श्रावण सरी’ सोहळ्याचे. रविवारच्या पावसाळी वातावरणात रंगलेल्या या सोहळ्याला सुप्रसिध्द अडावदकर ज्वेलर्स पेढी आणि ख्यातनाम सोनी पैठणी यांचे विशेष सहकार्य लाभले.

कॉलेज रोडवरील पलाश सभागृहात हा सोहळा तब्बल तीन तासांहून अधिक वेळ रंगला. यामध्ये उखाणे स्पर्धा, पारंपारिक पेहराव स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उखाणे स्पर्धेत मीनाक्षी मेतकर, अश्विनी दामले, छाया कोठावदे, दिपाली थोरात, तृप्ती अमृतकर, प्रेमलता कुलकर्णी, आदिती गायधनी यांनी सहभाग नोंदवला.

उखाणे स्पर्धेतील विजेते..

१. अनिता खैरनार २. अदिती गायधनी ३. छाया कोठावदे

पारंपारिक पेहराव स्पर्धा देखील उत्साहात पार पडली. सहभागी स्पर्धकांनी निसर्गनिर्मित पाने, फुले आणि फळांचे अलंकार परिधान केल्याने चांगलीच रंगत दिसून आली. या स्पर्धेत विद्या बागुल, योगिता बागुल, सुचेता गायधनी, सुरेखा सांगळे, सुमन चव्हाण, भारती शेवाळे, सायली ब्राह्मणकर आदींनी सहभाग नोंदवला.

पारंपारिक पेहराव स्पर्धेतील विजेते..

१. विद्या बागुल २. सुचेता गायधनी ३. योगिता बागुल

नृत्य स्पर्धेतील स्पर्धकांनी वैविध्यपूर्ण गीतांवर ठेका धरल्याचे दिसून आले. या स्पर्धेत विनया भावे, शीला गलांडे, वर्ष बेंद्रे, उषा सोनार आदी स्पर्धक सहभागी झाले.

नृत्य स्पर्धेतील विजेते..

१. शीला गलांडे २. विनया भावे ३. वर्षा बेंद्रे

विजेत्यांना ज्येष्ठ लेखिका वंदना रकिबे, आदर्श शिक्षिका तिलोत्तमा बाविस्कर, परीक्षक मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी स्वयंसिद्धा बहुद्देशीय संस्थेच्या समन्वयक रुक्मिणी जोशी आणि मानसी सजगुरे या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सुनेत्रा मांडवगणे यांनी केले.

तीनही स्पर्धांचे परीक्षण ज्येष्ठ कलावंत, दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांनी केले.

मंगळागौर खेळाने आणली रंगत..

दरम्यान, सोहळ्याच्या पूर्वार्धात स्पर्धांचे सोपस्कार पार पडल्यानंतर उत्तरार्धात सुप्रसिध्द हिरकणी ग्रुपच्या सदस्यांनी सादर केलेल्या मंगळागौर खेळाने रंगत आणली. ग्रुप लीडर मृणाल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिकतेला लाभलेला आधुनिकतेचा साज. सुमारे दीड तास उत्तरोत्तर रंगलेल्या अद्वितीय अशा या सादरीकरणात झिम्मा, फुगड्या, गाठोडे या प्रकारांनी उपस्थितांची दाद मिळवली. या खेळांमध्ये मृणाल कुलकर्णी यांच्याशिवाय सुरेखा पाराशरे, प्रीती अग्निहोत्री, राजश्री तावडे, मधुरा कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी, स्मिता बोबडे, धनश्री जोशी, कुशला अग्निहोत्री आणि श्रेया गणपुले यांचा सहभाग राहिला.

लकी ड्रॉ चे विजेते..

या सोहळ्याला उपस्थित सदस्यांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भाग्यवंत विजेत्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. विजेत्यांमध्ये प्रीती अग्निहोत्री, मृणाल कुलकर्णी, भारती शेवाळे, मंदाकिनी पगारे, दिपाली थोरात, उज्जवला कुलकर्णी, मंजुषा भाडळकर, अनिता खैरनार, राजश्री कर्पे यांचा समावेश राहिला.

अडावदकर ज्वेलर्स, सोनी पैठणी यांचे विशेष सहकार्य

दरम्यान, ‘श्रावण सरी’ सोहळ्याला सुप्रसिध्द अडावदकर ज्वेलर्स ( कॅनडा कॉर्नर, नाशिक ) तसेच येवला आणि नाशिक येथील ख्यातनाम सोनी पैठणी या दालनांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Comments are closed.