
- बनावट संकेतस्थळाचा आधार; देवस्थानच्या वतीने पोलीसांत तक्रार अर्ज
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : बनावट संकेतस्थळ बनवून पुजा विधीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक होत असल्याची गंभीर बाब श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे उघडकीस आली आहे. खुद्द देवस्थानच्या वतीने तशा आशयाची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्याने खळबळ माजली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक व्यवहार करून भाविकांना गंडा घातला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार, सध्या पवित्र श्रावण महिना सुरु असून देशभरातील भाविक धार्मिक विधीसाठी त्र्यंबकेश्वर येथे येत असतात. या स्थितीचा लाभ उठवण्यासाठी काहींनी बनावट संकेतस्थळ बनवून पुजा विधीच्या नावाखाली भाविकांकडून पैसे उकलण्याचा गोरखधंदा सुरु केला आहे. या संकेतस्थळावर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहातील छायाचित्र प्रसृत करण्यासह सवलतीच्या दरांत पुजाविधी करण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा दावा देवस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. शारावणी सोमवार जलाभिषेक, गोदावरी जलाभिषेक, बिल्वपत्र अभिषेक इत्यादी धार्मिक सेवांच्या नावाखाली विविध भागातील भाविकांकडून online रक्कम स्वीकारण्यात येत आहे. यासाठी बनावट अँप्लिकेशन्सचा देखील वापर होत असल्याचे देवस्थानाने निदर्शनास आणून दिले आहे.
सदर प्रकारामुळे त्र्यंबकेश्वर देवस्थानची प्रतिमा मलीन होत असून जगभर असलेली विश्वासार्हता धोक्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. समाज माध्यमांवरील हे बनावट संकेतस्थळ तसेच aplications तत्काळ हटवण्यात यावे. तसेच संबंधित बँक खाते, युपीआय आयडी, पेमेंट गेटवे आणि तत्सम आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी. शहराची प्रतिमा मलीन करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्या तक्रारीत करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थानची तक्रार प्राप्त झाली असून सायबर विभागाच्या वतीने अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया पोलीस खात्याच्या वतीने देण्यात आली.
Comments are closed.