NGN News
Latest Marathi News

गुन्हेगार मुलं/पुरुष यांच्या घरातील महिलांचे मानस शास्त्र कसे असते?

** एनजीएन न्यूज नेटवर्क

गुन्हेगारी ही केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाशी जोडलेली एक जटिल समस्या आहे. जेव्हा एखाद्या घरातील मुलगा किंवा पुरुष गुन्हेगारीकडे वळतो, तेव्हा ‘त्यांच्या संगोपनात काय कमतरता राहिली?’ आणि ‘घरातील महिला आई, पत्नी, बहीण त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरून का घालतात किंवा विरोध का करत नाहीत?’ असे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. समुपदेशन ला आलेल्या अनेक प्रकरणातून तसेच बाल गुन्हेगार यांचे समुपदेशन करतांना काही बाबी प्रकर्षाने जाणवतात. या मध्ये जास्त करून कुटुंबातील महिलांनी जर वेळीच योग्य पाऊल उचलले, कठोर निर्णय घेतले तर समाजातील गुन्हेगारी कमी होवू शकते हि गोष्ट अधोरेखित होते.

महिलांचा गुन्हेगारी कमी होण्यामध्ये मोलाचा सहभाग असू शकतो म्हणून या घटकांचा सखोल मानसशास्त्रीय आणि सामाजिक दृष्टीकोनातून विचार करणे गरजेचे आहे.
बालसंगोपनातील कमतरता आणि गुन्हेगारी प्रवृत्ती या विषयाचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, मूल तसेच मोठे झाल्यावर तेच मुलं समाजात पुरुष म्हणून वावरतांना आपले लहानपणापासून चे संस्कार, घरातले वातावरण यातूनच घडतं किंवा बिघडत असते.
मुलांनी गुन्हेगार होण्यामागे केवळ आई-वडिलांचा अथवा त्याला सांभाळणाऱ्या व्यक्तींचा दोष असतो असे नाही, परंतु संगोपनातील काही प्रमुख त्रुटी मुलांच्या मानसिक विकासावर विपरीत परिणाम करतात आणि मोठे होवून हीच मुलं अट्टल गुन्हेगार होतात.

पुरुष गुन्हेगार का होतात?यामध्ये घरातील महिलांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय सहभाग असतो? हे या लेखा मार्फत आपण समजावून घेणार आहोत. मुलं लहान असताना त्याचा अतिलाड करणे किंवा किंवा त्याच्याकडे अती दुर्लक्ष करणे हे अत्यंत चुकीचे असते. काही कुटुंबांमध्ये मुलांच्या चुकीच्या वर्तनाकडे “लहान आहे” म्हणून सुरुवातीलाच दुर्लक्ष केले जाते किंवा त्यांचे अतिलाड पुरवले जातात. याउलट, काही घरांमधे मुलांकडे पूर्णपणे भावनिक दुर्लक्ष होते, ज्यामुळे ती मुलं बाहेर चुकीच्या संगतीत आदर, प्रेम, जवळीक व अस्तित्व शोधू लागतात. उलटपक्षी अनेक घरात पहिल्या पासूनच हिंसक वातावरण असते जसे की घरातील वडील, काका, मामा हे व्यसनी असतात, त्यांनी देखील त्यांच्या पत्नीवर, मुलींवर, बहिणींवर अन्याय अत्याचार, शिवीगाळ, मारझोड करतांना मुलांनी पाहिलेले असते. महिलांना कायम स्वतःच्या नियंत्रणात ज्या घरात ठेवले जाते त्या ठिकाणी मुलं रुक्ष, कठोर आणि भावना हीन होण्याची संभावना जास्त असते. ज्या मुलांना घरात बालपणी हिंसाचार, भांडणे किंवा वडिलधाऱ्या व्यक्तींचे गुन्हेगारी वर्तन पाहायला मिळते, तिथे मुले हिंसा हीच समस्येचे उत्तर मानू लागतात त्यामुळे त्यांच्या मनातील करुणा, दया माया या भावना बालपणीच मरून जातात.

एकंदरीत सर्वच बाबतीत घरात शिस्तीचा अभाव असणे आणि कोणत्याही नैतिक मूल्यांची जोड नसणे, योग्य आणि अयोग्य यातील फरक स्पष्ट न शिकवणे, समाज कश्या प्रकारे काम करतो, सर्वसामान्य कुटुंब, आदर्श कुटुंब काय असते हे मुलांना समजावले जातं नाही. मुलांच्या आर्थिक गरजा भागवताना त्या पैशांचा स्रोत काय आहे हे महिलांनी न पाहणे यामुळे सुद्धा मुलांना बालपणी पासूनच कोणतेही चांगली तत्व, योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आपली आर्थिक गरज भागते आहे न इतकीच कमकुवत विचार शक्ती घरातील स्त्री जेव्हा ठेवते तेव्हा मुलांच्या आयुष्यात योग्य आदर्श म्हणून कोणतीही प्रतिमा तयार होत नाही. योग्य आणि सरळ मार्गाने प्रगती कशी करावी, आयुष्यात खरे पणाला, प्रामाणिक पणाला सचोटी ला, मेहनतीला आणि कष्टाला किती किंमत असते हे कोणीही लहानपणी मुलांना सांगितलेले नसते. अश्या मुलांना मोठे झाल्यावर पैसे मिळवण्यासाठी, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग स्वीकारणे सोपे वाटते.

अनेक घरातून मुलांची संगत, मित्र मैत्रिणी तपासले जातं नाहीत. घरात सतत कामाच्या व्यापात गुरफटलेल्या महिला असल्यास मुलं कोणासोबत राहतात, त्यांच्या वर बाहेरील कोणाचा प्रभाव आहे याबद्दल घरी माहिती घेतली जातं नाही, मुलांना योग्य वेळ दिला जात नाही, मुलांशी मोकळा संवाद साधला जातं नाही. घरातील जबाबदार महिलांचे मुलांच्या नकारात्मक संगतीवर नियंत्रण नसले की मुलं कोणासोबत उठतात-बसतात आणि मोकळा वेळ कसा घालवतात याबद्दल पालक अंधारात राहतात. मुलांच्या संगतीवर पालकांचे बारीक लक्ष नसल्यास मुलं भरकटायला वेळ लागत नाही.

आपण बघतो की, अनेक घरात मुलांच्या गुन्ह्यांवर पांघरून घातले जाते चुकीचे वागल्यावर मुलाला समजावणे, वेळी च त्याला आवर घालणे यात घरातील महिला कमी पडतात. आपले मुलं अथवा आपल्या घरातील पुरुष गुन्हे करत आहे हे माहिती असून सुद्धा त्याच्या वर पांघरून घालण्यामागील स्त्रियांचे मानसशास्त्रीय कारणे समजावून घेणे गरजेचे आहे.
घरातील पुरुष गुन्हेगारी कृत्य करत असतानाही महिला गप्प राहतात किंवा त्यांचा बचाव करतात, यामागे काही तीव्र मानसशास्त्रीय आणि सामाजिक कारणे असतात त्याचा विचार होणे गरजेचे आहे .

मातृत्वाचा आंधळा मोह (Maternal Blind Spot) हा सगळ्यात महत्वाचा घटक गुन्हेगार मुलाच्या आईच्या अथवा ज्या महिलेने या मुलाला लहानच मोठं केल, मुलाला भविष्यात गुन्हेगार बनवण्यासाठी कारणीभूत ठरतो. आईचे अथवा मुलाला वाढवणाऱ्या स्त्रीचे मुलावर असणारे अथांग प्रेम तिला मुलाच्या चुका स्वीकारू देत नाही. “माझा मुलगा असा करूच शकत नाही” किंवा “परिस्थितीने त्याला भाग पाडले”, तसें करण्याशिवाय त्याला पर्याय च नव्हता असा तीव्र नकार (Denial) तिच्या मानसिकतेत तयार होतो.

आर्थिक व सामाजिक परावलंबित्व हा महत्वाचा मुद्दा पुरुषांच्या गुन्हेगारी वृत्तीकडे दुर्लक्ष करायला महिलांना भाग पाडतो. अनेक भारतीय कुटुंबांमध्ये महिला आर्थिकदृष्ट्या पुरुषांवर अवलंबून असतात. पुरुष तुरुंगात गेला किंवा त्याला शिक्षा झाली, तर घराचा गाडा कसा चालणार आणि मुलांचे काय होणार, घरातील इतर लोकांचे काय होणार या भीतीपोटी त्या गप्प राहणे पसंत करतात. गुन्हेगार असलेल्या पुरुषाबद्दल प्रचंड भीती आणि धाक घरातील महिलांना असतो. गुन्हेगारी प्रवृत्तीचे पुरुष घरातील महिलांवरही मानसिक किंवा शारीरिक अत्याचार करतात. आपण विरोधाचा सूर आवळल्यास स्वतःच्या किंवा मुलांच्या जीवाला धोका निर्माण होईल, संपूर्ण कुटुंबातील लोकांची जबाबदारी घेणारा जर कायमचा रागावला, घर सोडून गेला, त्याने आत्महत्या केली आणि तो दुरावला तर सगळं घर कोलमडून जाईल या भीतीपोटी त्या मौन बाळगतात.

सामाजिक प्रतिष्ठा आणि कलंक (Stigma) हा महिलांसाठी खूप संवेदनशील भाग असतो. “लोक काय म्हणतील?” किंवा कुटुंबाला समाजात काळे फासले जाईल, कुटुंबाची बदनामी होईल, नातेवाईक मित्र मैत्रिणी, शेजारी आपल्याला दुरावतील या भीतीने महिलांकडून गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केला जातो. घरातील मुला मुलींचे भविष्यात लग्न होणार आहे , घरात वयोवृद्ध व्यक्ती आहेत, रुग्ण आहेत ज्यांना असे धक्के सहन होणार नाहीत हे माहिती असल्यामुळे महिलांना गप्प बसावे लागते. घरातील पुरुष गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे जर बाहेर कोणाला लक्षात आले तर घराचे भविष्य धोक्यात येईल, लोकं आपल्यालाच दोष देतील, आपल्या संस्कारांवर लोकं प्रशचिन्ह उठवतील या भीतीने आणि घराची पत वाचवण्यासाठी महिला गुन्ह्यांवर पांघरून घालतात.

‘लर्नडहेल्पलेसनेस’ (Learned Helplessness) म्हणजेच सततच्या नकारात्मक वातावरणामुळे महिलांना असे वाटू लागते की त्या परिस्थिती बदलू शकत नाहीत. आता परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेलीं आहे. विशेषतः मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्ती नुसार आपण लहानपणी च याला आळा घालू शकलो नाही आता वेळ निघून गेलीं आहे हे महिलांना तो मुलगा मोठा होवून अट्टल गुन्हेगार झाल्यावर समजते. या हतबलतेमुळे घरातील महिला अन्यायाविरुद्ध किंवा गुन्ह्याविरुद्ध बोलण्याचे सोडून देतात कोणत्याही स्वरूपाचा विरोध करण्याची मानसिक भावनिक ताकद त्यांच्यात उरत नाही. एकदा गुन्हेगारी क्षेत्रात घुसलेला माणूस घरातील महिलांचे ऐकून स्वतःला बदलेल हि शक्यताच उरत नाही. ऐक गुन्हा केला काय आणि अनेक गुन्हे केले काय कायदेशीर प्रक्रिया तीच असते, आपले काही बिघडत नाही हा पक्का गैरसमज ज्यावेळी त्या गुन्हेगाराचा होतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास खूप वाढलेला असतो. अश्या व्यक्ती समोर घरातील महिलांची कोणतीही ताकद चालत नाही.

थोडक्यात काय तर गुन्हेगारी थांबवण्यासाठी केवळ कायद्याची भीती पुरेशी नाही. कुटुंबात सुरुवातीपासूनच नैतिक मूल्यांचे संगोपन होणे, चुकीच्या गोष्टीला पहिल्या टप्प्यातच विरोध करण्याची सवय लावणे आणि महिलांना आर्थिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा घरातील महिला गुन्ह्याला पांघरून न घालता योग्य वेळी विरोध करतील, तेव्हाच गुन्हेगारी प्रवृत्तीला सुरुवातीलाच आळा बसू शकेल. घरातील स्त्री जर सुसंस्कृत, सुशिक्षित, नैतिकता आणि मूल्य जोपासणारी असेल तर ती नक्कीच समाजात मोकाट फिरणारे, समाजाला त्रासदायक ठरणारे गुन्हेगार स्वतःच्या घरातून निर्माण होवू देणार नाही.

काउन्सिलर मीनाक्षी जगदाळे 9766863443

Comments are closed.