
- विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन; ‘एसआयटी’ चौकशीची मागणी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
मुंबई/नाशिक : अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या चार हजार कोटींच्या निविदा प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी गुरुवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या आरोपाद्वारे आ. कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा पुढे केला आहे. आ. कांदे यांनी सदर निविदा रद्द करीत या प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी करण्याची मागणी यावेळी केली. या प्रकरणात मंत्री भुजबळ यांचे पुतणे समीर यांचा हात असून त्याला मंत्री भुजबळ हे पाठीशी घालत असल्याचे आ, कांदे म्हणाले. याआधीपर्यंत वाहतूक निविदा तीन वर्षांसाठी काढल्या जात असताना यंदा त्या पाच वर्षांसाठी काढण्यात आल्याचा आरोप करत आ. कांदे यांनी या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बोट ठेवले. धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचा अधिकारी वर्गाचा अधिकार काढून घेण्यात आल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधताना त्यांनी कमकुवत तपास यंत्रणेमुळे गैरव्यवहाराला खतपाणी घातले जात असल्याचे स्पष्ट केले.
विशिष्ट ठेकेदारांना कामे
गेल्या बारा वर्षांपासून विशिष्ट ठेकेदारांना ही कामे दिली जात आहेत, असा आरोप करून आ. कांदे यांनी ही प्रक्रिया संगनमताने राबवल्याचे म्हटले आहे. निविदा प्रक्रियेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल याचिकेनंतर तिला स्थगिती मिळाल्याचा दावा आ. कांदे यांनी केला. या प्रकरणात दोषींवर कारवाई होईपर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
@ विधिमंडळामध्ये अन्न नागरी पुरवठा विभागाच्या एका टेंडर बाबत जाणीवपूर्वक काही लोकांनी धादांत खोटे आरोप केलेले आहेत माझा आणि या विषयाचा काहीही संबंध नाही मला मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निविदा प्रक्रिया राबविली गेली. या निविदा प्रक्रियेविरोधात काही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. न्यायालय यामध्ये योग्य तो निर्णय देईल आणि अन्न नागरी पुरवठा विभाग याचा अंमलबजावणी करेल. मात्र याचा कोणताही अभ्यास न करता वैफल्यग्रस्त असलेल्या व्यक्तीने राजकीय सूडबुद्धीने हे आरोप केले आहे त्यामुळे अश्या आरोपंकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.
समीर भुजबळ
माजी खासदार
Comments are closed.