NGN News
Latest Marathi News

वसाका कारखान्यात लाखोंची चोरी करताना चौकडी जेरबंद

  • तांब्याची तार, पितळी प्लेट लांबवण्याचा बेत असताना स्थानिकांची झडप

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लोहोणेर/ पंडित पाठक

विठेवाडी ( ता.देवळा ) येथील गेल्या चार वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या वसाका कारखान्यातून शुक्रवार (ता.३) रोजी दिवसाढवळ्या दुपारच्या सुमारास जवळपास लाखो रुपयांची तांब्याची तार व सुमारे २५० ते ३०० किलो वजनाची पितळी प्लेट असा एकूण सुमारे तीन ते चार लाख रु.चा मुद्देमालची चोरी करताना चौघांना स्थानिक तरुणांनी रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे हे चौघेजण या वसाका कारखान्याचे सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. वसाकात आतापर्यंत बाहेरचे चोरटे चोरी करत असल्याचे संशय व्यक्त होत होते.मात्र आता तर कुंपणच शेत खाऊ लागल्याने वसाकातील चोरीचे हे सत्र कसे थांबवायचे याबाबत परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या चारही चोरट्याना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत रात्री उशिरापर्यंत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बंद अवस्थेत असलेल्या वसाका कार्यस्थळावर शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एमएच१५एफ६१६१ ही चारचाकी मारुती ८०० हवं वाहन संशयितरित्या फिरत असल्याने या परिसरातील काही तरुणांना शंका आली. या तरुणांनी या वाहनाचा पाठलाग करत वसाका-लोहोणेर रस्त्यावर सदर वाहन अडवले. त्यात लाखो रु.किमतीचे तांब्याची तार व मिलमधील मोठी पितळी प्लेट आढळून आली. या किमती मालाबाबत चौकशी केली असता ही मालमत्ता वसाका कारखान्यावरून चोरल्याचे या चोरट्यांनी कबूल केले. ही वार्ता परिसरात समजताच वसाका कार्यस्थळावर मोठी गर्दी जमली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल होत चौघाही चोरट्यांना मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेतले. हे चारही चोरटे वसाकाचेच सुरक्षा कर्मचारी असून ज्यांच्या भरवशावर वसाकाची जबाबदारी असताना तेच चोर निघाल्याने परिसरात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. चोरीत सामील असलेल्या या चौघांमध्ये हितेंद्र गंगाधर भामरे (रा. ठेंगोडा), शरद तानाजी गरुड, शरद वामन गरुड (दोघेही रा. भऊर), भाऊसाहेब दिलीप गांगुर्डे (रा. महालपाटणे ) यांचा समावेश असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरक्षा पर्यवेक्षक कैलास पुंडलिक गरुड यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय देवरे, सुरेश कोरडे, दिलीप सोनवणे पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.