
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार यांच्या ६५ व्या जयंतीच्या निमित्ताने बुधवार, दि.१ जुलै रोजी सुप्रसिद्ध अभिनेते, खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे “महाराष्ट्र धर्म” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दिवंगत नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार यांचे नुकतेच निधन झाले आहे. सुमारे ४० वर्षे पक्षीय संघटनेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या रविंद्रनाना पगार यांनी सुमारे १५ वर्षाहून अधिक काळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ‘जिल्हाध्यक्ष’ पदाची धुरा यशस्वीपणे पार पाडली.
ॲड. रविंद्रनाना पगार यांच्या ६५ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘सुविचार मंच’ या नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या वतीने अभिनेते खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे “महाराष्ट्र धर्म” या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच महात्मा फुले या महापुरुषांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांचे हे व्याख्यान शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार, महाराष्ट्राची प्रगतीशील परंपरा, महाराष्ट्राचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा तसेच आधुनिक महाराष्ट्रासमोरील आव्हाने यांवर प्रकाश टाकणारे असेल.
बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी, सायंकाळी ५ वाजता नाशिक शहरातील रावसाहेब थोरात सभागृह येथे संपन्न होणाऱ्या या व्याख्यानासाठी नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुविचार मंच संस्थेच्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आले आहे. या प्रेरणादायी व्याख्यानासाठी सर्वांना विनामुल्य प्रवेश आहे.
Comments are closed.