
- अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा आणि जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा शासकीय योजनेत मोफत उपलब्ध
नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क
जागतिक दर्जाची आरोग्यसेवा तेही मोफत आणि परवडणाऱ्या दरात पुरवणाऱ्या एसएमबीटी हॉस्पिटलने वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा खोवण्यात यश मिळवले आहे. ‘एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट’च्या तज्ज्ञ कार्डियाक सर्जनच्या टीमने अत्यंत क्लिष्ट मानल्या जाणाऱ्या ‘१०० दिवसांत १०० मिनिमली इन्व्हेजिव्ह कार्डियाक शस्त्रक्रिया’ ज्याला सर्वसामान्यांच्या भाषेत ‘की-होल सर्जरी’ (Key Hole Surgery) म्हटले जाते या शस्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्याची कामगिरी केली आहे. इतरत्र कुठेही जागतिक दर्जाचे हे उपचार शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील शेकडो रुग्णांना वेदनामुक्त आणि सुरक्षित नवजीवन मिळाले आहे.
हृदयविकार किंवा बायपास शस्त्रक्रिया करायची असल्यास छातीचा मधला भाग (बरगड्या) पूर्णपणे कापावा लागतो हे सर्वज्ञात आहे. मात्र, एसएमबीटी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्समध्ये उपलब्ध असलेल्या ‘MICS’ तंत्रज्ञानामुळे आता केवळ काही मिलिमीटर ते सेंटीमीटर आकाराचे लहान छिद्र घेऊन अत्यंत सुलभतेने या शस्त्रक्रिया पार पाडल्या जातात. छातीचे हाड न कापता डाव्या बाजूला छोटा कट देऊन केली जाणारी बायपास सर्जरी. हार्ट व्हॉल्व्ह रिपेअर आणि रिप्लेसमेंट, हृदयाचे निकामी झालेले झडप (व्हॉल्व्ह) बदलणे किंवा दुरुस्त करणे. जन्मजात हृदयातील छिद्र बंद करणे, लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या हृदयातील छिद्र लहान चिरा देऊन बंद करणे. कार्डियाक ट्यूमर रिमूव्हल (Myxoma) हृदयातील गाठी काढणे. यासारख्या अनेक शस्रक्रियांचा समावेश आहे.
एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल ३० हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी शस्रक्रिया आणि प्रक्रिया (प्रोसिजर्स) झाल्या आहेत. नवजात बालकांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया येथे केल्या जातात. विशेष म्हणजे, एसएमबीटी हॉस्पिटल ना नफा ना तोटा या तत्वाने कार्य करत आहे. त्यामुळे शासकीय योजनेत याठिकाणी या अद्यायवत शस्रक्रिया समाविष्ट करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे इतर हॉस्पिटल्समध्ये याच शस्रक्रीयांना ३ ते ५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. यात अत्याधुनिक शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, बायपास आणि बालहृदयरोग शस्त्रक्रिया यांचा समावेश असून एसएमबीटीत या शस्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत.
एसएमबीटी हॉस्पिटलपासून अगदी जवळच समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज असल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील (नागपूर, अमरावती, बुलढाणा, जालना) रुग्णांना हे हॉस्पिटल अत्यंत जवळचे व सोयीचे झाले आहे. यासोबतच मध्यप्रदेश, ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी या भागातील रुग्णांचा ओघ वाढला आहे. रुग्णांच्या सोयीसाठी नाशिक आणि कसाऱ्याहून ‘आरोग्यरथ’ ही मोफत बससेवा दररोज चालवली जाते, तर कल्याण-भिवंडीहून एसटी महामंडळ आणि मोफत बससेवादेखील सुरु करण्यात आल्या आहेत.
—
अनेक रुग्ण रक्तवाहिन्यांच्या त्रासामुळे बायपासचा सल्ला दिल्यानंतर ‘ओपन हार्ट’ सर्जरीच्या भीतीने उपचार लांबणीवर टाकतात. अशा रुग्णांसाठी ‘की-होल’ म्हणजेच मिनिमली इन्व्हेझिव्ह सर्जरी हे वरदान ठरत आहे. यात आम्ही छातीचे हाड कापण्याऐवजी बरगड्यांच्या मधून एक लहान छिद्र (Key-hole) करून बायपास किंवा व्हॉल्व्हची शस्त्रक्रिया करतो. यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येत नाही, हाडाला दुखापत होत नाही आणि रुग्ण अगदी ३ ते ४ दिवसांत स्वतःच्या पायावर उभा राहून घरी जाऊ शकतो.
डॉ. विद्युतकुमार सिन्हा,
हृदयविकार शस्त्रक्रिया तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल
१०० दिवसांत १०० यशस्वी मिनिमली इन्व्हेजिव्ह शस्त्रक्रिया पूर्ण करणे हा आमच्या संपूर्ण टीमच्या सांघिक प्रयत्नांचा आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा विजय आहे. ‘युज हार्ट फॉर एव्हरी हार्ट’ या थीमनुसार सर्वसामान्यांना जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा मोफत देणे हाच आमचा ध्यास आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये येणारा सर्वात गरीब रुग्ण हा येथील व्हीआयपी रुग्ण असून त्यासही जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवा मिळण्याचा हक्क असून तो त्यांना प्रदान करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. यासाठी शासकीय यंत्रणेवरील भार कमी करत शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे.
– सचिन बोरसे
संचालक, आरोग्यसेवा,
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट)
२४ तास सेवा आणि अद्ययावत पायाभूत सुविधा
हार्ट इन्स्टिट्यूटचे विभागप्रमुख डॉ. गौरव वर्मा आणि हृदयविकार शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची आणि पॅरामेडिकल स्टाफची टीम २४ तास रुग्णसेवेसाठी सज्ज आहे. या डॉक्टरांना तब्बल दोन तपांचा अर्थात २४ वर्षांहून अधिक प्रदीर्घ अनुभव आहे. एसएमबीटीमध्ये १२०० बेडसचा आंतररुग्ण विभाग, २०० आयसीयू बेड आणि अत्याधुनिक कॅथलॅब उपलब्ध आहेत. ४०० पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २६ पेक्षा अधिक वेगवेगळ्या स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली कार्यरत आहेत.
‘की-होल’ शस्त्रक्रियेचे प्रमुख फायदे:
- इन्फेक्शनची (संसर्गाची) शक्यता अत्यंत कमी.
- शस्त्रक्रियेदरम्यान कमीत कमी रक्तस्राव आणि वेदना.
- छातीवर कायमचे मोठे आणि विद्रूप व्रण (Scar) न राहणे (कॉस्मेटिकदृष्ट्या उत्तम).
- रुग्ण जलद गतीने बरा होऊन अवघ्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी रुग्णालयातून सुखरूप घरी जाऊ शकतो.
Comments are closed.