NGN News
Latest Marathi News

ग्राम स्वच्छता अभियान माळवाडी ग्रामपंचायत जिल्हयात प्रथम

** पंडीत पाठक

लोहोणेर : एनजीएन न्यूज नेटवर्क

राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये देवळा तालुक्यातील माळवाडी गावाने नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून गावातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन, सार्वजनिक स्वच्छता तसेच लोकसहभाग या सर्व बाबींमध्ये ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेचा तपासणी अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यात माळवाडी ग्रामपंचायत प्रथम आली आहे.

माळवाडी गावातील समस्त ग्रामस्थ, युवक मंडळे, महिला बचत गट आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त प्रयत्नातून गावात विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले आहेत. प्रत्येक घरासमोर स्वच्छ परिसर, कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त मोहीम आणि वृक्षारोपण यामुळे गावाचे रूप पालटले आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून गावावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय तपासणी अहवालात माळवाडी (ता. देवळा) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गावकऱ्यांनी स्वच्छतेच्या कामात स्वतःला झोकून दिले. या कामी आ. डॉ. राहुल आहेर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे गावातील मूलभूत सोयी-सुविधांचा दर्जा उंचावला आणि पर्यायाने जिल्हास्तरीय स्पर्धेत गाव अव्वल ठरले. या यशाबद्दल सर्व ग्रामस्थांचे व प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments are closed.