
** एनजीएन न्यूज नेटवर्क
आजवर कधीही हाती न लागलेली विधान परिषदेंतर्गत नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ‘जहागिरी’ येनकेन प्रकारे यावेळी काबीज करण्याच्या दृष्टीने भाजपने सावधपणे पावले टाकायला प्रारंभ केला आहे. महायुतीमध्ये मोठा भाऊ या नात्याने सर्वाधिक मतदार असल्याच्या मुद्द्यावर दावा ठोकून उमेदवारी पदरात पाडून घेण्याची भाजपची रणनीती आहे. भाजपचा हा कावा ओळखूनच शिंदेसेनेने सावध भूमिकेतून वातावरणनिर्मिती करण्याचे पाऊल उचललेले दिसते. खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक दौरा उरकवून नाशिकची जागा आमचीच असल्याचे सूतोवाच करून एकप्रकारे भाजपला इशारा दिला आहे. अर्थात, यासंदर्भातील अंतिम निर्णय महायुतीचे बिनीचे नेते घेतील, हे सांगून उमेदवारीबाबत त्यांनी फार ताणले जाणार नसल्याचे संकेतही दिलेत.
आजकाल कोणतीही निवडणूक असली की पहिला नैवेद्य आमचाच असायला हवा, या भूमिकेत भाजप असतो. मूळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत त्यांना भिडू नकोसा असतो, या भूमिकेची प्रचिती मुंबई वगळता इतरत्र महापालिका आणि तत्सम निवडणूका स्वबळावर लढवून त्या पक्षाने दिली आहे. विरोधक निष्प्रभ असल्याचा पुरेपूर लाभ उठवण्यात भाजप कोणतीही कसूर सोडत नाही. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून कधी राष्ट्रवादी कॉंग्रेस तर कधी शिवसेनेने वर्चस्व सिध्द केले आहे. भाजपला अद्यापपर्यंत ही जागा जिंकता आलेली नाही. गेल्या निवडणूकीत तर शिवसेनेविरूध्द राष्ट्रवादी कॉंग्रेस-भाजप एकत्र आले हाेते. तरीदेखील सेनेच्या नरेंद्र दराडे यांनी सफाईदार विजयाची नोंद करीत राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांना ‘आस्मान’ दाखवले होते. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. ६१९ पैकी तब्बल ४६६ मतदार महायुती नामक व्यवस्थेकडे तर १५३ विरोधकांकडे आहेत. यामध्ये भाजपकडे १८८ आणि शिंदेसेनेकडे १७१ सदस्य आहेत. याचा अर्थ फरक केवळ १७ संख्याबळाइतकाच आहे. याच अनुषंगाने आपला लढा विरोधकांशी नव्हे तर शिंदेंच्या शिवसेनेशी असल्याचे भाजपने हेरले आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास भाजप संख्याबळावर तर शिंदेसेना हक्काची जागा ( सिटींग गेटींग) म्हणून दावा करणार हे स्पष्ट आहे.
याधीच्या तीन निवडणूकांवर दृष्टीक्षेप टाकला तर दोनदा पालकमंत्री या नात्याने छगन भुजबळ यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने रणनीती आखून निवडणूकीत त्यांनी आपला ‘मोहरा’ सलग दुसऱ्यांदा विजयी केला होता. गतवेळी पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी जंगजंग पछाडून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. यावेळी मात्र, भुजबळ किती रस घेतात, याबाबत शंका आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे शंभरावर सदस्य मतदार असले तरी आतापर्यंत तरी देवदिास पिंगळे वगळता कोणी उमेदवारीसाठी ठाम दावा केलेला नाही, ना भुजबळ यांनी त्यावर भाष्य केलेले. स्वाभाविकच जिल्ह्याचे ‘अघोषित’ पालकमंत्रीपद सांभाळणारे गिरीश महाजन यांच्याभोवती ही निवडणूक फिरणार हे नक्की. राज्याच्या सत्तेमधील गणित बिघडू न देण्यासोबतच नाशिकमध्ये भाजपच्या संख्याबळ अनुषंगाने असलेल्या मर्यादा लक्षात घेता महाजन सामोपचाराच्या भूमिकेत असण्याची शक्यता अधिक आहे. कारण अगदीच तणातणी होऊन शिंदेसेनेने वेगळा निर्णय घेतला तर विपरित घडू शकते, याची महाजन आणि स्थानिक भाजप नेतृत्वाला पुरेशी जाणीव आहे. सत्तेमधील भिडूकडून आपटी खाणे भाजप नेतृत्वाला पचनी पडणार नाही. ‘सिटींग गेटींग फॉर्म्यूल्या’चे मायाजाळ समाधानकारक तोडगा काढणारे ठरणार नाही. या पार्श्वभूमीवर नाशिक आणि जळगावच्या जागांची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव पुढे येऊ शकतो. निवडणूकीतील बलाबल पाहता सगळी ‘प्रमेयं’ जुळून आल्यास महायुती ती एकहाती जिंकू शकते. सत्ताधारी आणि विरोधकांच्या संख्याबळातील तफावतीमुळे घोडेबेजार करून, असंतोषाचा लाभ उठवत चमत्कार करण्याच्या मानसिकतेत ‘मविआ’तील कोणी ‘धनिक’ असण्याचीही सुतराम शक्यता नाही.
सारांशात, दृश्यादृश्य कुरघोडी, अहंकारी श्रेष्ठत्वभाव, विरोधकांना कुचकामी समजण्याची आणि सवंगड्यांना गृहित धरण्याची वृत्ती यांसारखे मुद्दे आड न आल्यास भाजपच्या अधिपत्याखालील महायुती नाशिकचा गड सहजगत्या जिंकू शकते. डबल इंजिन सरकारला निर्णायक संख्याबळाची साथ, चार मंत्र्यांसह चौदा आमदारांचे पाठबळ, विरोधकांतील ऐक्याचा अभाव या बाबी महायुतीच्या पथ्यावर आहेत. दुसरीकडे दीडशे संख्याबळाच्या आसपास असलेले विरोधक ‘निर्नायकी’ अवस्थेमध्ये आहेत. दुभंगलेल्या शिवसेनेतील उध्दव ठाकरे गटासह कॉंग्रेसमध्ये स्मशानशांतता आहे, तर अशीच काहीशी अवस्था राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात दिसून येतेय. मालेगावच्या सत्ताकारणात ‘चमक’ प्राप्त केलेल्या इस्लाम पार्टी अन् जनता दलाची धाव मर्यादित आहे. कळीचा मुद्दा म्हणजे विरोधकांची मोट बांधणारे दखलपात्र, तितकेच सर्वमान्य नेतृत्व नाही. अशा परिस्थितीत नाशिक मतदारसंघातील निवडणूक केवळ औपचारिकता राहणार आहे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही.
Comments are closed.