NGN News
Latest Marathi News

फुटलेल्या ‘नीट’ पेपरची १० लाखांत खरेदी, १५ लाखांत विक्री

  • तपासात खळबळजनक माहिती समोर; मोठ्या साखळीच्या सहभागाची शक्यता 

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : वैद्यकीय प्रवेशासाठी निर्णायक मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेला फुटीचे ग्रहण लागल्याने देशभर खळबळ माजली आहे. प्रकरणातील संशयित शुभम खैरनारने पुण्यातील धनंजय नामक परीचितासोबत हातमिळवणी करत सदर कांड घडवल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. शुभम आणि धनंजय यांनी पेपर लीक करण्याचा कट रचला. धनंजयने फुटलेला पेपर शुभमला १० लाख रुपयांना विकला आणि त्यानंतर शुभमने टेलिग्रामद्वारे तो पेपर १५ लाख रुपयांना विकल्याचा तपास यंत्रणांना दात संशय आहे.

दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणातील संशयित शुभम खैरनारला घेऊन सीबीआय टीम मंगळवारी मध्यरात्री मुंबईला रवाना झाली. तत्पूर्वी, सीबीआयने शुभम याचा नाशिक पोलिसांकडून ताबा घेऊन शुभम त्याची रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी केली. प्रकरणात लाखो रुपयांची आर्थिक अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शुभम याने धनजंय याच्याकडून १० लाखांना विकत घेतलेला पेपर टेलिग्रामद्वारे १५ लाख रुपयांना विकल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या ‘डील’ नंतर प्रश्नपत्रिका काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरली आणि परीक्षेची गोपनीयता पूर्णपणे संपुष्टात आली. नाशिकमधून अटक केलेल्या तरुणाचा एक साथीदार पुण्यात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुणे पोलिसांकडून संबंधित तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

स्पेशल ऑपरेशन ग्रुप ( एसओजी ) च्या लेखी फुटलेल्या ‘नीट’ पेपरच्या लाभार्थी यादीत १५० विद्यार्थी आणि ७० पालकांचा समावेश आहे. एसओजी ने आपल्या ताब्यातील तेरा एमबीबीएस समुपदेशकांचा ताबा सीबीआयकडे दिला आहे.

अशी आहे शुभमची पार्श्वभूमी..

या प्रकरणातील संशयित शुभम खैरनार हा मूळ नाशिक जिल्ह्यातील नांदगावचा रहिवासी आहे. नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात त्याची स्वतःची मेडिकल काऊन्सलिंग एजन्सी आहे. मध्य प्रदेशातील भोपाल येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा तो पूर्वाश्रमीचा विद्यार्थी आहे. तो नाशिकला ज्या इमारतीत वास्तव्यास होता, तिथल्या रहिवाशांना त्याचे नावदेखील माहित नव्हते, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे. दरम्यान, आपला मुलगा निर्दोष असून त्याला या प्रकरणात नाहक अडकविण्यात आल्यची प्रतिक्रिया शुभमच्या वडिलांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

Comments are closed.