
- अशोक खरात प्रकरणात तीन तास सखोल चौकशी
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संशयाच्या फेऱ्यात असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रूपाली चाकणकर अखेर रविवारी नाशिकमध्ये विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) चौकशीसाठी हजर झाल्या. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी त्यांची सुमारे तीन तास सखोल चौकशी केली. या चौकशीत काय निष्पन्न झाले, याचा तपशील सध्या गोपनीय ठेवण्यात आला असला, तरी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
अशोक खरात प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत असूनही चाकणकर आतापर्यंत तपास प्रक्रियेपासून लांब होत्या. मात्र, रविवारी सकाळी त्या पुण्याहून थेट नाशिकला पोहोचल्या. दुपारी १२:३० च्या सुमारास त्या महाराष्ट्र पोलीस अकादमी येथील एसआयटी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. सुमारे तीन तास त्यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
बहिणीनंतर आता रूपाली चाकणकर रडारवर
यापूर्वी या प्रकरणात रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची एसआयटीने सुमारे ८ तास चौकशी केली होती. आता स्वतः रूपाली चाकणकर यांची चौकशी झाल्याने या प्रकरणाची पाळेमुळे कुठेपर्यंत रुजलेली आहेत, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. अशोक खरात सध्या २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत असून, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच ही चौकशी केली जात असल्याचे समजते.
पतसंस्थेची सर्व खाती बनावट
चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रूपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खळबळजनक दावा केला की, “समता आणि जगदंबा पतसंस्थेची सर्व खाती बनावट आहेत. याचा अधिकृत अहवाल लवकरच समोर येईल.” या दाव्यामुळे आता या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचे एक नवीन वळण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एसआयटीच्या भूमिकेकडे लक्ष
भोंदू खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी अनेक हाय-प्रोफाईल व्यक्तींची चौकशी केली आहे. चाकणकर यांच्या चौकशीतून खरातच्या काळ्या साम्राज्याबद्दल काय नवीन माहिती समोर येते आणि पोलीस यावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
“एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासात पोलिसांना काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. तपासात माझे पूर्ण सहकार्य राहील. तुमच्या मनात अनेक शंका आहेत, पण तपास पूर्ण झाल्यावर सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.”
— रूपाली चाकणकर, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस
चौकशीनंतर पुण्याकडे रवाना
सुमारे चार तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर रूपाली चाकणकर पुण्याकडे रवाना झाल्या. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्या भविष्यातही पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करतील. एसआयटीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिल्याची दावा चाकणकर यांनी केला. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, एसआयटीच्या चौकशीत त्यांना अनेक तिखट प्रश्नांचा सामना करावा लागला.
Comments are closed.