NGN News
Latest Marathi News

वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी; भोंदूबाबाच्या कृत्यांचा पर्दाफाश

  • वन्यजीवांचे अवयव जप्त; वनविभाग पथकाची कारवाई

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : इगतपुरी परिसरात वनविभागाने एका भोंदू बाबावर धडक कारवाई करत त्याच्या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश केला आहे. चंद्रकांत राजेंद्र माळी ( 33) याला वनविभागाच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे अवयव जप्त करण्यात आले आहेत.

गिरणारे परिसरात एक तरुण भोंदूगिरी करून वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून आरोपीच्या घरावर छापा टाकला. आरोपीच्या घरातून वनविभागाला वन्यजीवांच्या अवयवांचा मोठा साठा मिळून आला. यामध्ये रानडुकराचे दात, सांबर आणि काळवीटाची शिंगे, घुबडाचे अवयव, सालिंदरचे काटे, मोरपिसे आणि एका तलवारीचा समावेश आहे. या जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 2 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. वनविभागाने आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 ‘सर्च वॉरंट’ गिळंकृत केले..

दरम्यान, वनविभागाचे अधिकारी अधिकृत सर्च वॉरंट घेऊन आरोपीच्या घरी पोहोचले, तेव्हा स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी आणि कारवाईत अडथळा आणण्यासाठी आरोपी चंद्रकांत माळी याने चक्क वनविभागाचे ‘सर्च वॉरंट’च तोंडात टाकून चावून खाऊन टाकले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याच्या कृत्याला दाद न देता त्याला तत्काळ ताब्यात घेऊन घराची झडती घेतली.

Comments are closed.