
- शाल्मली क्षत्रिय मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित फ्रावशी इंटरनॅशनल प्रेझेंट्स नाशिक महिला प्रीमियर लीग ( NWPL ) मध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान , गोल्फ क्लबवर झालेल्या अंतिम फेरीत अनंत सांगळे यांच्या सांगळे स्ट्राईकर्सने कल्पेश भुतडा यांच्या बालाजी सुपर नोव्हाजवर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
अंतिम सामन्या नंतर लगेचच या पहिल्यावहिल्या NWPL स्पर्धेचा पुरस्कार सोहळा जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन व महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उत्कृष्टपणे राखलेले क्रिकेट मैदान पाहून खुश झालेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात जोरदार फलंदाजी केली. खेळाडू म्हणून आपल्या महविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत त्यांनी सर्व खेळाडूंना व्यायामाचे महत्व पटवून देत व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. आणि महत्वाचे म्हणजे मा. गिरीश महाजन यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर लवकरच प्रकाश झोताची व्यवस्था करून देण्यात येईल याची महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह खात्रीपूर्वक ग्वाही दिली.
या प्रसंगी पाचही संघाचे मालक, स्पर्धा समन्वयक क्रीडकचे विनोद यादव व सर्व संबंधितांना गौरविण्यात आले. मंचावर एम व्ही पी चे सरचिटणीस नितीन ठाकरे,प. विभाग सभापती पाटील, लक्ष्मण सावजी,रोहिणी नायडू, सुधाकर बडगुजर, अंकिता शिंदे, गोल्डी आनंद, NWPL समितीच्या शर्मिला साळी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व सेक्रेटरी समीर रकटे उपस्थित होते. समीर रकटे व कुणाल कातकाडे यांनी सूत्र संचालन केले तर आभार प्रदर्शन समीर रकटे यांनी केले. पुरस्कार सोहळयास सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पालक , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी हेमंत देशपांडे , योगेश मुन्ना हिरे, चंद्रशेखर-बंडू- दंदणे, विक्रांत मते ,निखिल टिपरी , तरुण गुप्ता, महेन्द्र ( राजू ) आहेर, राघवेंद्र जोशी ,हेतल पटेल ,जगन्नाथ पिंपळे, शिवाजी उगले ,अनिरुद्ध भांडारकर ,बाळासाहेब उमाजी मंडलिक ,नितीन सदाशिव धात्रक, प्रवीण घुले आदी उपस्थित होते.
याआधी अंतिम फेरीत बालाजी सुपर नोव्हाजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ४६ अशा स्थितीतून कर्णधार तेजस्विनी बाटवालच्या ५२ धावांमुळे २० षटकात ९ बाद १२२ धावा केल्या. गौरी अहिरेने १७ धावा केल्या. सांगळे स्ट्राईकर्सच्या श्रद्धा जगतापने ३, कर्णधार शाल्मली क्षत्रिय व कल्याणी कुटेने प्रत्येकी २ तर प्रचिती भवरने १ बळी घेतला.
विजयासाठी १२३ धावांचा पाठलाग करताना सांगळे स्ट्राईकर्सच्या सलामीच्या नेहा शेलार व कर्णधार शाल्मली क्षत्रिय या जोडीने उपांत्य फेरीप्रमाणेच पुन्हा एकदा शतकी भागीदारी तर रचलीच पण त्याही पुढे जाऊन १६.२ षटकात बिनबाद १२३ धावा करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. नेहा शेलारने आपला धडाका कायम ठेवत लागोपाठ चौथे अर्धशतक नोंदवत नाबाद ७० धावा फटकावल्या तर कर्णधार शाल्मली क्षत्रियने नाबाद ४१ धावा केल्या.
Player of the match ठरली नेहा शेलार तर विजेत्या संघाची कर्णधार शाल्मली क्षत्रियने Player of the Series चा पुरस्कार मिळवला. नेहा शेलारला सर्वोत्कृष्ट फलंदाज, श्रुती गीतेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर उपविजेत्या संघाची कर्णधार तेजस्विनी बाटवालला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून गौरविण्यात आले.
Comments are closed.