- लिक्विड मेडिकल ऑक्सिजन तसेच औद्योगिक वायू उत्पादन केंद्र उभारणार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यातील दिंडोरी औद्योगिक वसाहतीत एसीई गॅसेस टेक्नोलॉजीज इंडिया प्रा. लि. नामक कंपनी ७५० कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकारने आठ कंपन्यांसोबत करार केला असून त्यांतर्गत नाशिक जिल्ह्यात ही मोठी गुंतवणूक येणार आहे.
या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्रात एकूण ४४ हजार ७१० कोटींची गुंतवणूक येणार आहे. यामधून एकूण सात हजार रोजगार निर्माण होणे शक्य होणार आहे. एसीई गॅसेस टेक्नोलॉजीज इंडिया प्रा. लि. कंपनी दिंडोरी तालुक्यातील तळेगाव-अक्राळे औद्योगिक परिसरात कार्यरत होणार आहे. नव्या प्रकल्प उभारणीत कंपनी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन तसेच औद्योगिक वायू उत्पादन केंद्र उभारणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकल्पातून निर्मित लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्रमाण तीनशे टनाच्या आसपास राहील. पहिल्या टप्प्यात पाचशे कोटी तर दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी रक्कम गुंतवण्यात येणार आहे. औद्योगिक आणि वैद्यकीय gas उत्पादनातील एक प्रमुख कंपनी म्हणून एसीई गॅसेस टेक्नोलॉजीज इंडिया प्रा. लि. चा देश्भर लौकिक आहे. नव्या प्रकल्पामुळे नाशिक औद्योगिक परिसरात अर्थकारणाला गती मिळून रोजगार निर्माणाला देखील चालना मिळेल असा आशावाद ‘निमा’चे अध्यक्ष आशिष नहार यांनी व्यक्त केला आहे.
Comments are closed.