NGN News
Latest Marathi News

मुख्यमंत्री म्हणाले, म्हाडाला फसवणाऱ्या कोणाचीही गय करणार नाही

  • नाशिकमधील सदनिका घोटाळा प्रकरणी तकारीवर भाष्य

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : सर्व समावेशक गृहनिर्माण योजना आपण उभारत असलेल्या प्रकल्पाला लागू होऊ नये यासाठी विकासकांनी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या घटनेची आ.सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. विकासकांकडून झालेल्या फसवणूकीमुळे आर्थिक दुर्बल घटकातील लोक शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहिले असून विकासक तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आ.हिरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली. कारवाईतून एकही आरोपी सुटणार नसल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी आ.हिरे यांना दिली आहे.

म्हाडाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या इमारतीमधील सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी न देता बनावट शिक्के आणि कागदपत्रे तयार करून खुल्या घटकांना विक्री केल्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकोनपन्नास जणांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.म्हाडा सदनिका घोटाळा उघडकीस आल्याने शहरवासी यांच्या मनात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची शंका

म्हाडा सदनिकेच्या घोटाळ्याची व्याप्ती खूपच मोठी असून यामध्ये विकासकांसह इतर शासकीय विभागातील काही अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची शंका मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आली. या घोटाळ्यामुळे शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील शेकडो लोक शासनाच्या योजनेपासून वंचित राहिले असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. सदरच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. सदर गंभीर घटनेची दखल घेतली असून कारवाईतून एकही आरोपी सुटणार नसल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

Comments are closed.