NGN News
Latest Marathi News

डीएसपी म्युच्युअल फंड सर्वेक्षण : बहुसंख्य महिला स्वतंत्र गुंतवणूक निर्णय घेतात

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

डीएसपी म्युच्युअल फंडाने युगव्ह संस्थेच्या सहकार्याने ‘डीएसपी विनव्हेस्टर पल्स 2025–26’ हा संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध केला आहे. तब्बल तेरा शहरांमध्ये ५,०५० गुंतवणूकदारांच्या या देशव्यापी सर्वेक्षणातून भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील एका मोठ्या बदलाचे चित्र या अहवालातून नजरेसमोर आले आहे. महिला आता त्यांच्या आर्थिक निर्णयांची जबाबदारी पुर्वीच्या तुलनेत अधिक प्रमाणात स्वतः घेताना दिसत आहेत, मात्र दुसरीकडे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणि सुनियोजित आर्थिक नियोजन यांच्यातील दरी अधिक रुंदावत चालल्याचा मुद्दाही प्रकाशझोतात आला आहे.

बहुतांश महिलांनी (५६ टक्के) गुंतवणुकीचे निर्णय त्या स्वतः घेत असल्याचे सांगितले आहे. २०२२ मधील ४४ टक्क्यांच्या तुलनेत स्वतंत्रपणे निर्णय घेण्याऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचा महत्त्वपूर्ण बदल या संशोधनातून समोर आला आहे. पुरुषांचे प्रमाण ६८ टक्के आहे आणि ते आजही आघाडीवर असले तरी, महिलांमधील हा वाढती भरारी केवळ त्यांचा वाढता सहभागच नव्हे तर एक मोठा संरचनात्मक बदल दर्शवत आहे. स्वतंत्रपणे निर्णय घेणे याचा अर्थ कोणाचाही सल्ला न घेणे, असा अजिबात होत नाही. महिला आता निर्णयातील स्वायत्तता आणि सल्लागार यांची योग्य सांगड घालत आहेत. जवळपास चारपैकी एक महिला (२०२२ मधील १७ टक्क्यांच्या तुलनेत २०२५ मध्ये २४ टक्के) व्यावसायिक सल्लागाराचा सल्ला घेऊन पूर्णपणे स्वतंत्रपणे निर्णय घेत असल्याचे दिसून आले आहे.

पतीकडून मिळणारे प्रोत्साहन देखील एक महत्त्वाचा घटक समोर आला आहे; महिला त्यांच्या गुंतवणूक प्रवासात आपल्या जोडीदाराचा प्रभाव असल्याचे प्रकर्षाने नमूद करतात. तसेच स्वतःला ‘स्वयं-शिक्षित गुंतवणूकदार’ म्हणवून घेणाऱ्या महिलांचे प्रमाण १३ टक्क्यांवरून १६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यातून त्यांचा वाढता आर्थिक आत्मविश्वास आणि स्वतःहून शिकण्याची वृत्ती दिसून येते.  

तरीही डीएसपीचे हे संशोधन एक विलक्षण विरोधाभास आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आणतो. पुरूष आणि महिलांमधील ८४ टक्के गुंतवणूकदारांनी स्वतःचे गुंतवणुकीचे निर्णय घेताना आत्मविश्वास वाटत असल्याचे स्पष्ट केले आहे, तर केवळ ३३ टक्के व्यक्तींनी त्यांची आर्थिक ध्येये अतिशय स्पष्ट असून ती गाठण्यासाठी एक नियोजित आराखडा त्यांच्याकडे असल्याचे सांगितले आहे. जवळपास ५० टक्के व्यक्तींनी ‘दीर्घकालीन गुंतवणूक’ म्हणजे तीन वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधी असल्याचे मत व्यक्त केले आहे, तर केवळ २८ टक्के व्यक्ती ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीला ‘दीर्घकालीन’ समजतात. परताव्याच्या अपेक्षेतून वर्तणुकीतील भिन्नता अधिक मोठी असल्याचे यातून उघड झाली आहे. ३० टक्के गुंतवणूकदारांच्या मते महागाईवर मात करणे पुरेसे आहे, तर २२ टक्के गुंतवणूकदारांचे उद्दिष्ट बाजारापेक्षा सरस कामगिरी करण्याचे आहे. तसेच २१ टक्के व्यक्ती त्यांच्या परताव्याची तुलना मित्रांनी किंवा सहकाऱ्यांनी मिळविलेल्या परताव्याशी करतात. गुंतवणूकदारांचे जरी सक्षमीकरण झाले असले आणि गुंतवणुक सुलभता आता सहज शक्य असली, तरी शिस्तबद्ध नियोजन आणि कालमर्यादेची स्पष्टता या पातळीवर अजूनही व्यापक सुधारणेला वाव असल्याचे या संशोधनातून दिसून आलेले आहे.

पैशाचा भावनिक अर्थ ही संकल्पना देखील आता व्यापक प्रमाणात बदलताना दिसत आहे. पैशाचा संबंध ‘स्वातंत्र्याशी’ जोडण्याचे प्रमाण २०२२ मध्ये २७ टक्के होते. ते आता २०२५ मध्ये थेट ३५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर ‘अस्तित्व टिकवणे’  आणि ‘गरज’ यांच्याशी असलेला संबंध कमी झाला आहे. जवळपास ४८ टक्के व्यक्तींनी आपण प्रामुख्याने आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षितता मिळवण्यासाठी गुंतवणूक करत असल्याचे स्पष्ट केलेले आहे. ही धारणा २०२२ मध्ये ४४ टक्के होती. महिलांमध्ये, पैशाचा संबंध सुरक्षिततेसोबतच महत्त्वाकांक्षी उपभोग किंवा चैनीच्या वस्तूंची खरेदी याच्याशी अधिक दृढ होताना दिसत आहे. यातून त्यांच्या आर्थिक कर्तृत्वाच्या व्यापक बदल दिसून येतो.

व्यक्तींच्या आकांक्षा आता बदलताना दिसत असून पारंपारिक मालमत्ता खरेदी करण्यापलीकडे विस्तारल्या आहेत. राहणीमानाचा दर्जा सुधारणे आणि निवृत्तीसाठी बचत करणे, ही आजही प्रमुख आर्थिक उद्दिष्टे असली तरी, जीवनशैलीशी संबंधित पसंतीला मिळत असलेले प्राधान्य अधिक प्रमाणात वाढत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः २५ ते ४४ वयोगटातील ४१ टक्के महिला घर खरेदी करण्यापेक्षा प्रवासाला अधिक प्राधान्य देत आहेत. घर खरेदी करणे हे सर्वात मोठे स्वप्न आहे, हे सांगणाऱ्यांचे प्रमाण २०२२ मधील ३६ टक्क्यांवरून २०२५ मध्ये २८ टक्क्यांपर्यंत घसरले आहे, तर सुट्ट्या आणि पर्यटनावर होणारा खर्च स्त्री-पुरुष या दोन्ही गटांत वाढलेला आहे. आता खूप कमी लोकांनी हातात रोकड शिल्लक नसल्याचा मुद्दा मान्य केला आहे. यातून त्यांचा आर्थिक व्यवहारात सहभाग वाढलेला आहे, तसेच रोकड सुलभता वाढली आहे, या दोन्ही बाबी दिसून येतात.

व्यावसायिक सल्ल्यावर विश्वास ठेवणार्‍यांचे प्रमाण अजूनही अतिशय उच्च पातळीवर असल्याचे दिसून आले आहे. आर्थिक सल्लागारांची मदत घेणाऱ्यांपैकी जवळपास ९४ टक्के व्यक्तींनी या सेवेबद्दल समाधान व्यक्त केलेले आहे. मात्र, आजही बहुतांश गुंतवणूकदार सल्लागारांची मदत घेत नाहीत. सल्ला न घेणाऱ्यांपैकी ३९ टक्के व्यक्तींनी आर्थिक माहिती उघड करण्यास संकोच वाटत असल्याचे सांगितले आहे तर, ३५ टक्के व्यक्तींना अन्य माहितीचे स्त्रोत पुरेशे वाटतात, तर ३२ टक्के व्यक्ती त्यांना बाह्य व्यक्तीचा सल्ला घेणे कठीण वाटत असल्याचे नमुद करतात. सल्ला न घेण्यामागील अडथळे हे असमाधानापेक्षा वैयक्तिक गोपनीयतेची काळजी आणि सल्ल्याचे महत्त्व न समजणे, यातच अधिक प्रमाणात दडले असल्याचे दिसून येते.

तब्बल ६२ टक्क्यांहून अधिक म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी बाजार घसरला तरी ते आपली गुंतवणूक सुरूच ठेवणार असल्याचे मत मांडले आहे. यातून  गुंतवणूकदारांमधील जोखीमेबाबत वाढती सहनशीलता दिसून येते. बाजार घसरलेला असताना पुरुष आपली गुंतवणूक वाढवण्याची शक्यता जास्त असते (महिलांच्या १० टक्के तुलनेत १५ टक्के पुरुष), तर महिलांचा डेट म्युच्युअल फंड आणि ईटीएफमधील सहभाग तुलनेने जास्त आहे. यातून स्त्री-पुरुषांच्या जोखीम घेण्याच्या बदलेल्या परंतु प्रगल्भ होत चाललेल्या जाणीवांवर प्रकाशझोत पडला आहे.

पिढ्यानपिढ्यांमधील बदलत्या समीकरणामुळे अधिकाधिक बारकावे दिसून आले आहेत. वारसाहक्काने आपल्याला काही प्रमाणात मालमत्ता मिळाली असल्याचे ५८ टक्के व्यक्तींनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे, ४१ टक्के पुरुषांच्या तुलनेत ४५ टक्के महिलांनी आपल्या आर्थिक वारशावरील हक्क सोडण्याबाबत प्रचंड आत्मविश्वास प्रकट केलेला आहे. आजही अनेक पालक मुलगा आणि मुलगी यांना गुंतवणुकीचा सल्ला देताना भेदभाव करत असले तरी, २०२२ पासून हा भेदभाव कमी झाल्याचे दिसून आले आहे. यातून आर्थिक सामाजिकीकरणात हळूहळू होत असलेले बदल दिसून येतात.

डिजिटल माध्यमांचा वापर अधिक वाढलेला आहे.  विशेषतः महिलांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांपैकी, सोशल मीडियावर शेअर बाजाराशी संबंधित आशय प्रदान करण्यात किंवा त्यावर टिप्पणी करण्यात महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्रिय आहेत. त्याचबरोबर गुंतवणुकीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत गुंतवणूकदारांमध्ये काहीशी सावध उत्सुकता दिसून येते. ४६ टक्के व्यक्तींनी डेटाची गोपनीयता  ही सर्वात मोठी चिंता असल्याचे स्पष्ट केले आहे, तर पुर्वीची चांगली कामगिरी,  अल्गोरिदच्या पातळीवर पारदर्शकता आणि नियामक मंजुरी हे त्यांच्यासाठी विश्वासाचे मुख्य घटक ठरले आहेत.

सदर संशोधन अहवालातील निष्कर्षांवर भाष्य करताना, डीएसपी  म्युच्युअल फंडाच्या अध्यक्षा अदिती कोठारी देसाई म्हणाल्या, “भारतीय महिला त्यांच्या आर्थिक प्रवासात केवळ सहभाग नोंदवण्यापासून ते स्वतःकडे मालकी असणे, या बदलापर्यंत पोहोचल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून आलेले आहे. केवळ स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात वाढ झालेली नसून,  माहितीपूर्ण स्वातंत्र्यात वाढ झाल्याचा मुद्दा ‘विनव्हेस्टर पल्स’च्या या अहवालामुळे खास करुन समोर आलेला आहे. महिला आता अधिकाधिक ज्ञान मिळवताना दिसत आहेत,  शेअरबाजाराशी जोडल्या जात आहेत, सल्लागारांशी चर्चा करत आहेत आणि स्वतःच्या अटींनुसार आपल्या आर्थिक आकांक्षांना आकार देत आहेत. आमच्यासाठी हे मुद्दे विश्वास, पारदर्शकता आणि दीर्घकालीन भागीदारीवर आधारित अर्थप्रणाली तयार करण्याचा मुद्दा अधोरेखित करत आहे.”

म्युच्युअल फंडाचे एमडी आणि सीईओ कल्पेन पारेख या अहवालाबाबत टिप्पणी करताना म्हणाले: “दर तीन वर्षांनी, ‘विनव्हेस्टर पल्स’ सर्वेक्षण हे एका आरशासारखे काम करते. हा अहवाल आम्हाला आमच्या प्रगतीचा मागोवा घेण्यास त्याचबरोबर संपत्ती व्यवस्थापक व गुंतवणूकदार जगतात महिलांना त्यांच्या आर्थिक निर्णयांची जबाबदारी घेण्यास सक्षम करण्याबाबत सखोल चर्चा करण्यास मदत करते. या अहवालातून मिळालेला संदेश अतिशय साधा सरळ आहे आणि तो म्हणजे जेव्हा महिला आत्मविश्वासाने गुंतवणूक करतात, तेव्हा कुटुंबे अधिक सुरक्षित होतात आणि दीर्घकाळात अतिशय चांगले परिणाम दिसून येतात. आर्थिक स्वातंत्र्य हा केवळ एक पर्याय नव्हे, तर तो सन्मान, सोशिकता आणि संपत्ती निर्मितीचा पाया आहे.”

हा केवळ महिलांपुरता मर्यादीत असलेला विषय नाही. महिलांना त्यांच्या आयुष्यात शिकण्यासाठी, सहभागी होण्यासाठी आणि गुंतवणुकीचे स्वतंत्ररित्या निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आणि सक्षम बनवण्यात पती, वडील आणि भाऊ या साऱ्यांची देखील एकसारखी जबाबदारी आहे. खरे सक्षमीकरण ही एक सामायिक जबाबदारी आहे.

जनजागृतीचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत झाले पाहिजे, ही डीएसपीची ठाम धारणा आहे. आमच्या ‘नो मोर’ आणि ‘आय विल नॉट स्टॉप’ या विशेष गुंतवणूक मोहिमांसोबतच, आम्ही आमच्या यु ट्यूब चॅनेलवर तीन भावनिक लघुपट देखील प्रदर्शित केले आहेत. जेव्हा महिला पैशांची जबाबदारी स्वतःच्या हातात घेतात, तेव्हा ते किती प्रभावी ठरू शकते, हे या लघुफितींव्दारे अधोरेखित करण्यात आलेले आहे.

‘डीएसपी विनव्हेस्टर पल्स २०२५-२६’ हा अहवाल अशा गुंतवणूकदारांवर प्रकाश टाकतो, जे पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वासाने पाऊल टाकत आहेत, डिजिटल माध्यमांशी जोडलेले गेलेले आहेत आणि जीवनात काही तरी साध्य करायचे या महत्त्वाकांक्षेने भारलेले आहेत. आणि या परिवर्तनात महिला आघाडीवर आहेत. भविष्यातील संधी केवळ सहभाग वाढवण्यात नसून, भारतातील या वाढत्या गुंतवणूकदार समुदायामध्ये दीर्घकालीन शिस्त, विश्वास आणि आर्थिक स्पष्टता अधिक दृढ करण्यातच खऱ्या अर्थाने दडलेली आहे.

Comments are closed.