- उद्योजकांच्या अडीअडचणींबाबत सकारात्मक बैठक संपन्न
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) कार्यालयात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)च्या अधिकाऱ्यांसोबत औद्योगिक क्षेत्रातील विविध पायाभूत सुविधा तसेच उद्योजकांच्या अडीअडचणींबाबत सकारात्मक बैठक संपन्न झाली.
या बैठकीस निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष किशोर राठी, मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, किरण पाटील, ऊर्जा समिती अध्यक्ष मिलिंद राजपूत, प्रवीण वाबळे तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश थूल, कार्यकारी अभियंता अनिल झटकरे व घुमे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)चे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील आदी उपस्थित होते.
निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी सिन्नर औद्योगिक वसाहतीत नवीन वीजपुरवठा तसेच वाढीव वीजभार मंजुरीस येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर मांडणी केली. तसेच मंजूर असलेल्या नवीन सबस्टेशनच्या उभारणीस गती देणे आणि विद्यमान सबस्टेशनमध्ये नव्याने तसेच वाढीव क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्याची मागणी केली.
सिन्नर येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीतील सध्या कार्यरत असलेली तीनही वीज उपकेंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने वाढीव भार मंजुरी किंवा नवीन कनेक्शन देणे कठीण होत आहे, अशी परिस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली. यावर मंजूर असलेल्या नवीन सबस्टेशनसाठी आवश्यक जागा हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दीपक पाटील यांनी दिले. तसेच औद्योगिक क्षेत्रातील विविध उपकेंद्रांमध्ये ५ व १० एमव्हीए क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर तातडीने बसवून नवीन वीजजोडण्या सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर बैठकीस सुधीर बडगुजर, रवी पुंडे, सचिन कांकरेज, गोविंद बोरसे, अनिल मंत्री, दिलीप पिंगळे, शरद टर्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.