- उद्घाटन सोहळ्याला डॉ. अश्विनीताई बोरस्ते, हेमंतआप्पा धात्रक यांची उपस्थिती
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
गोविंद नगर येथे गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या १९व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य ‘आनंद मेळावा’ आयोजित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते व श्री. हेमंत आप्पा धात्रक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष माननीय ओमप्रकाश वर्मा तसेच देवरे, मोरे, पवार, देशमुख, निकम आदी पदाधिकारी आणि अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वर्षी प्रथमच संघाच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, परिसरातील सुमारे ५५ उद्योजिका व व्यावसायिक महिलांनी विविध स्टॉल्सच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. खाद्यपदार्थ, कापड उद्योग, मध, मिरची उत्पादने, केळीचे वेफर्स, पापड, उकडीचे मोदक तसेच इतर लघुउद्योगांच्या वस्तूंची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. एकदिवसीय या मेळाव्यामुळे परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
उद्योजकतेवर भर
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. अश्विनी ताईंनी संघाच्या या अभिनव उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. बचत गटांच्या मेळाव्यांमधून महिलांच्या उद्योजकतेला चालना मिळते, याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की –
“स्वतःचा ब्रँड, दर्जेदार पॅकिंग आणि आकर्षक प्रेझेंटेशन या गोष्टी आजच्या स्पर्धात्मक युगात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गुणवत्ता चांगली असेल तर ग्राहक आपल्याला शोधून येतो. जिद्द, संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली तर यश निश्चित मिळते.”
महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन सांघिक प्रयत्नांनी उद्योग उभारावेत, कारण देशाच्या प्रगतीत महिलांच्या उद्योजकीय सहभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असेही त्या म्हणाल्या. आपल्या अनुभवातून त्यांनी संघर्ष आणि कामकाजातील सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र : काळाची गरज
हेमंत धात्रक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांच्या उपक्रमांमुळे आई-वडिलांच्या छत्रछायेची आठवण होते. विरंगुळा केंद्रांच्या माध्यमातून ज्येष्ठांचे एकत्रिकरण होत असून, शहरातील ज्येष्ठांना आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अशा उपक्रमशीलतेची आजच्या काळात नितांत गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धकांचा गौरव
मेळाव्यात विविध स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सहभागी झालेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आदरणीय मोरेदादा यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय पवार दादांनी करून दिला.
या प्रसंगी व्यासपीठावर ओमप्रकाश शर्मा, देवरे दादा, नाईक दादा, रत्नपारखी दादा, शिलार दादा आदी मान्यवर उपस्थित होते.
गोविंद नगर ज्येष्ठ नागरिक संघाचा हा १९वा वर्धापन दिन आणि आनंद मेळावा ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आणि महिलांच्या उद्योजकतेला प्रेरणा देणारा ठरला. सामाजिक एकात्मता, उत्साह आणि सकारात्मकतेचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
Comments are closed.