** एनजीएन न्यूज नेटवर्क
पक्षातील ज्येष्ठता अव्हेरून वाट्याला येऊ पाहणारे उपमहापौरपद नाकारल्याच्या निषेधार्थ शिन्देसेनेच्या नाशिक महानगरप्रमुखांनी उगारलेली बंडाची तलवार काही तासांतच म्यान केली. यामुळे अगदी अखेरच्या क्षणी महापालिकेत सत्तेची ऊब मिळालेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षात निर्माण होऊ पाहणारे वादळ चहाच्या पेल्यातील स्वरूपाचे ठरले. थेट मुखीयाने कान टोचल्याने तूर्तास प्रवीण तिदमे यांनी पांढरे निशाण फडकावले असले तरी निर्मित शांतता भविष्यातील वावटळाचे बीजारोपण ठरू नये म्हणजे झाले. कारण आपल्याहून पक्षात ‘ज्युनिअर’ असलेल्यांचे आणि हल्ली निर्णयाधिकार राखून असलेल्यांवर तिदमे यांनी केलेले शरसंधान दुर्लक्षणे म्हणजे वस्तुस्थितीकडे डोळेझाक केल्यासारखे होईल.
एकनाथ शिंदे यांनी एकसंध शिवसेनेला उभा छेद देत स्वतंत्र चूल मांडली. मुंबई-ठाणे वगळता राज्यात जे मोजके मावळे शिन्देसेनेच्या पालखीचे भोई बनले, त्यामध्ये नाशिकमधून प्रवीण तिदमे यांचा समावेश होता. नव्या पक्षाचा जन्मच मुळी सत्तेच्या पाळण्यात झाल्याने काळानुरूप मावळ्यांची संख्याही वर्धिष्णू होत गेली. तिदमे यांच्याकडे अपेक्षेनुरूप शहराचे म्होरकेपण आले. प्रशासकीय राजवट असूनही पक्षात आलेल्या माजी नगरसेवकांना मुख्यमंत्री पदावरील शिंदेंनी भरभरून निधी देण्याचे औदार्य दाखवले. स्वाभाविकच प्रस्तावित ‘फिल्डिंग’साठी अनेकांनी शिन्देसेनेचा रस्ता प्रशस्त मानला. तिदमे यांच्या लेखी पक्षात ‘ज्युनिअर’ असलेल्या अजय बोरस्ते यांनी अनेक माजी नगरसेवकांना गळाला लावत पक्षविस्तार घडवून आणला. नेमक्या याच मुद्द्यावरून तिदमे-बोरस्ते यांच्यात छुपे युध्द सुरु झाले. संख्याबळात उजवे ठरलेल्या बोरस्तेंवर नेतृत्वाची मेहेरनजर राहिली. जिल्हाप्रमुख, उपनेते अशा कोंदणांनी त्यांना समृद्ध करण्यात आले. उण्यापुऱ्या तीन वर्षांचे वय असलेल्या पक्षात गटबाजीला उधाण आले. याच कारणाने संपर्क प्रमुख असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांना बाजूला करून राम रेपाळे या एकनाथांच्या खास पठडीतील नेत्याकडे नाशिकची धुरा सोपवण्यात आली.
सत्तेच्या पाळण्यात जन्मलेल्या या पक्षात अनेक महत्वाकांक्षी नेत्यांची ‘एन्ट्री’ होत गेली. मग कोण कोणाच्या संपर्कातून आले, याचा लेखाजोखा मांडला जाऊ लागला. पक्षातील गटबाजी शिगेला पोहोचली. पुढे मालेगावच्या ‘दादा’ मंत्र्यांच्या उपस्थितीत गटबाजी समूळ संपवण्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या. तथापि, महापालिका निवडणुकीत पुन्हा गटबाजीने डोके वर काढले. शिन्देसेनेला सत्तेत सोबत घेण्याच्या भल्या ‘पहाटेच्या निर्णया’ने गटबाजी टोकाला पोहोचली. आपणच उपमहापौर पदाचे खरे दावेदार असल्याचे मानणाऱ्या प्रवीण तिदमे यांच्यासह महिला जिल्हाप्रमुख सुवर्ण मटाले यांना प्रदेश ( की स्थानिक ? ) नेतृत्वाने झटका देत उमेदवारीची सुभेदारी पक्षात उशिरा आलेल्या विलास शिंदे यांना बहाल करण्यात आली. इथेच तिदमे यांचे पित्त खवळले. विलास शिंदेंच्या निवडीचा गुलाल खाली बसत नाही, तोवर तिदमेंच्या ज्येष्ठता मुद्द्याने उचल खाल्ली. बोरस्ते-शिंदे यांच्यावर थेट शरसंधान करीत तिदमे यांनी महानगरप्रमुख आणि नगरसेवक पदांचा राजीनामा देण्याची घोषणा केली. काही तासांतच ते ‘नॉट रिचेबल’ झाल्याने सस्पेन्स वाढला. थेट एकनाथ शिंदे यांनी या नाराजीनाट्याची दखल घेत तिदमे यांना राजीनामा देण्यापासून परावृत्त केले. मग माध्यम संवादाच्या दुसऱ्या अंकात दोन्ही पदांवर कायम राहण्याचा निर्णय तिदमे यांनी जाहीर केला आणि निर्माण होऊ पाहणारे वादळ चहाच्या पेल्यातील ठरले.
किमान, नाशिककरांच्या हितासाठी हा निर्णय घेण्याची अपरिहार्यता तिदमे यांना स्वीकारावी लागली असली तरी झालेल्या अन्यायाचा पाढा वाचताना त्यांच्यासोबत असलेल्या नगरसेवकांचे ‘सुरांत सूर ‘ मिळवणे दुर्लक्षून चालणार नाही. कारण, तिदमे यांचा आक्षेप ज्या बोरस्ते यांच्या नेतृत्वावर राहिलाय, त्यांच्याच नेतृत्वात तिदमे वगळता इतर मंडळी पक्षात आली होती, हे विसरून चालणार नाही. पक्षात नव्याने आलेल्यांना पदांची खिरापत वाटली जाणे हा या मंडळींच्या आक्षेपातील समान धागा राहिला. म्हणूनच आज शमलेले वादळ उद्या स्थायी अथवा अन्य समिती सदस्य नेमण्यावेळी पुन्हा निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको. सारांशात, सत्तेची नशा अनेकांच्या महत्वाकांक्षांना पालवी फुटण्यास पूरक ठरते. तिथे शिन्देसेना अपवाद ठरण्याचे कारण नाही. संयम, सर्वानुमत आणि व्यापकता या त्रिसूत्रीचा अवलंब करून पदांपेक्षा जनभावना प्रधानस्थानी ठेवण्याची भूमिकाच पक्षाला पुढे नेईल, हा विचार नेतृत्वाने स्थानिकांच्यात बिंबवणे तूर्तास सर्वहितैषी राहील, एव्हढेच यानिमित्ताने.
महापौरांचा सुखावह ‘रोडमॅप’
नाशिकमध्ये सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता प्राप्त केलेल्या भाजपने महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर जीवघेणी स्पर्धा असूनही हिमगौरी आहेर-आडके यांना संधी दिली. अर्थात, तसे करताना पक्षनिष्ठा, अनुभव, उच्चशिक्षण, राजकीय वारसा, सुसंकृत आणि आश्वासक चेहरा वगैरे मुद्दे विचारात घेतले गेले, हे दुर्लक्षून चालणार नाही. दिवंगत मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या पुतणी, नाशिकच्या माजी उपमहापौर शोभना आहेर आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष डॉ. बाळासाहेब आहेर यांच्या कन्या, चांदवड-देवळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या भगिनी असा समृध्द वारसा नूतन महापौरांना लाभला आहे. विशेष म्हणजे त्या स्वतःदेखील महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी राहिल्या आहेत. हे अवघे संपुट त्यांना महापौरपदी विराजित करण्यास पूरक ठरले.
नाशिक शहर विकासासाठी नेमका कोणता ‘रोडमॅप’ असणार याचा अजेंडा त्यांनी जाहीर केला. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करून नाशिकला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्याचा संकल्प हिमगौरी आहेर-आडके यांनी जाहीर केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारा निधी शहर विकासाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी व्यतीत करण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, शहर प्रतिमाबांधणी हे आपल्या प्राधान्यक्रमाचे विषय राहणार असल्याचेही त्या म्हणाल्या. एका अर्थाने, महापौर म्हणून आपल्याला मिळणारा कालावधी एक संधी मानून त्याचे सोने करण्याचा त्यांचा संकल्प विकासाची आस असणाऱ्या नाशिककरांना सुखावणारा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Comments are closed.