- अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक : ‘निमा’मधील व्याख्यानात प्रतिपादन
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला २०२६–२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प उद्योग क्षेत्राला मोठी चालना देणारा असून, संरक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदींमुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे प्रतिपादन विख्यात अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले.
निमा, आयमा, लघु उद्योग भारती, नाइस, महाराष्ट्र चैम्बर ऑफ कॉमर्स तसेच उद्योग व व्यापार आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने निमा सभागृहात केंद्र सरकारच्या २०२६–२७ च्या अर्थसंकल्पावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रशेखर टिळक यांनी अर्थसंकल्पातील तरतुदी, त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर तसेच उद्योग व इतर क्षेत्रांवर होणारा परिणाम आणि भविष्यातील संधी यांचा सविस्तर आढावा घेत, अतिशय सोप्या व अभ्यासपूर्ण भाषेत अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.
व्यासपिठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, लघु भारती उद्योगचे अध्यक्ष निखिल तापडिया, नाईसचे अध्यक्ष रमेश वैश्य, महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे, सुनील केदार, प्रदीप पेशकार, निमाचे सचिव राजेंद्र अहिरे, उद्योग आघाडीचे अध्यक्ष सतीश कोठारी, व्यापार आघाडीचे सूरज राठी आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण अर्थसंकल्पाचा आढावा घेतला असता त्यामध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही संकल्पना ठळकपणे दिसून येते. हा अर्थसंकल्प स्थिर व प्रगतिशील अर्थव्यवस्थेचे प्रतीक असून उद्योग क्षेत्राला गती देणाऱ्या विविध योजनांचा त्यामध्ये समावेश आहे. संरक्षण क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या भरीव तरतुदींमुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट होते. सध्या या क्षेत्रातील सुमारे ६७ टक्के उत्पादन देशांतर्गत होत असून, पुढील पाच वर्षांत हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा मानस या अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे लघु व मध्यम उद्योगांना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक उत्पादने निश्चितपणे तयार होतील, असा विश्वास व्यक्त करत, त्यादृष्टीने नाशिकमधील सर्व औद्योगिक संघटनांनी गांभीर्याने विचार करावा, असा सल्लाही टिळक यांनी दिला.
जागतिक व्यावसायिक वातावरणातील अस्थिरता व अशांतता असूनही भारतातील गुंतवणुकीला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोणताही अतिरिक्त करबोजा न वाढवता सादर केलेला हा उत्कृष्ट अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स (एसटीटी)च्या माध्यमातून एका बाजूला अमेरिकेला सूचक इशारा देत, तर दुसऱ्या बाजूला विकसित अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसून येतो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच अमेरिकेसोबत व्यापार करार होणे हे केवळ योगायोग नसून नियोजनबद्ध यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्रिप्टो करन्सी भारतासाठी कधीही फायदेशीर ठरणार नाही, ही भूमिका १९९१ पासून आजपर्यंतच्या सरकारांनी सातत्याने मांडल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. ब्रिक्स करन्सीची मुहूर्तमेढ ही जागतिक पातळीवरील नव्या आर्थिक समीकरणांना दिशा देणारी ठरेल, असेही त्यांनी सांगितले. सतरावर्षांनंतर प्रथमच म्युनिसिपल बाँड्सचा विचार करण्यात आल्याचा उल्लेख करत, नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याशी त्याची काही सांगड आहे का, याचा विचार होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी उद्योजकांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी विविध औद्योगिक संघटनांना एका मंचावर आणण्याचे प्रभावी पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सतीश कोठारी यांनी आपल्या खास शैलीत चंद्रशेखर टिळक यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन निमाचे सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले, तर निखिल तापडिया यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास निमाचे उपाध्यक्ष मनीष रावल, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, आयमाचे सरचिटणीस संजय महाजन, दिलीप वाघ, राजेंद्र कोठावदे, मिलिंद राजपूत, नितीन आव्हाड, कैलास पाटील, श्रीकांत पाटील, योगेश जोशी, श्रीपाद कुलकर्णी, रावसाहेब रकिबे, नानासाहेब देवरे, प्रमोद पुराणिक, दिपाली चांडक यांच्यासह अनेक उद्योजक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.