- उपमहापौरपदाची माळ शिवसेनेच्या विलास शिंदे यांच्या गळ्यात
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आधीच स्पष्ट बहुमत असताना मोक्याच्या क्षणी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अनुक्रमे २६ व ४ सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने नाशिक महापालिकेत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीची सत्ता स्थापित झाली. भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची १७ व्या महापौर तर शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ही युती महापालिका निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढली होती.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या राजीव गांधी सभागृहात सुरु झाली. महापौर पदासाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार सीमा पवार यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली. माघार अर्ज देण्यासाठी त्या हिमगौरी आडके यांच्यासोबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या. माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी हिमगौरी आडके यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. तसेच उपमहापौरपदासाठीही अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याने विलास शिंदे यांची निवडही बिनविरोध झाली. यावेळी महायुतीच्या नगरसेवकांनी जल्लोष करीत विजयाच्या घोषणा दिल्या.
महाजन यांचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असताना, ‘आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही,’ अशी भूमिका पक्षाचे प्रभारी तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर भाजप–शिवसेना शिंदे गट युतीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महाजन यांचे वक्तव्य यावेळी चर्चेत आले. नव्या समीकरणानुसार, भाजपकडे महापौरपद, तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद देण्यावर मतैक्य झाले. उपमहापौरपदासाठी सुरुवातीला शिवसेनेच्या बंटी तिदमे यांनीदेखील अर्ज दाखल केला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवरील निर्णयानंतर विलास शिंदे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात भाजपकडून नगरसेवकांना अधिकृत व्हीप जारी करण्यात आला होता.
मुंबईतील बैठकीनंतर सूत्रे हलली..
गुरुवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर भाजप–शिवसेना शिंदे गट युतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार भाजपकडे महापौरपद, तर शिवसेना शिंदे गटाकडे उपमहापौरपद देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विरोधी पक्षनेतेपद शिवसेना ( उबाठा) कडे
नाशिक महापालिकेत आता भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे अशी महायुती सत्तेत आली आहे. या घडामोडीमुळे शिवसेना ( उबाठा) चा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी पक्षनेते पदाची माला नेमकी कोणाच्या गळ्यात पडते, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहणार आहे.
Comments are closed.