नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणेनगर येथील विद्यार्थ्यांसाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. अगस्टीन पिंटो सर व संस्थापिका डॉ. ग्रेस पिंटो मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाशिकमधील सुप्रसिद्ध अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे शैक्षणिक क्षेत्रभेट दिली.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक उपचारपद्धती, वैद्यकीय तंत्रज्ञान तसेच त्या पद्धतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी केली जाते याबाबत सखोल माहिती देण्यात आली. यावेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे श्री. अनुप त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चर्चासत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. श्री. अनुप त्रिपाठी यांनी राणेनगर शाळेच्या या आगळ्या-वेगळ्या व स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
सेंट फ्रान्सिस हायस्कूल, राणेनगरच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत संगीत स्टुडिओ, हॉटेल, स्पोर्ट्स अकॅडमी, बी.एड. कॉलेज अशा विविध क्षेत्रांना भेटी देऊन तेथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले आहे. या सर्व क्षेत्रभेटींचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात योग्य करिअर निवडीसाठी दिशा मिळावी, हा आहे. हा अभिनव व दूरदृष्टीपूर्ण उपक्रम शाळेचे संस्थापक डॉ. अगस्टीन पिंटो सर यांनी सुरू केला आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंजू पाटील, विभागप्रमुख भाग्यश्री मराठे व शीतल चिंचोलीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed.