- श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषी महोत्सवास उत्तम प्रतिसाद; शेतकरी, विद्यार्थी, शेतकऱ्यांची भेट
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
भारताला थोर कृषी संस्कृती लाभली असून ती नवीन पिढीपर्यंत पोहचावी यासाठीच सेवामार्गाच्या वतीने कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शहरात येणाऱ्या सिंहास्थापूर्वी शेतकरी व शेतीशी संबंधित प्रत्येक घटकासाठी हा ज्ञानकुंभ उपलब्ध करून दिला असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांनी केले. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने आयोजित कृषी महोत्सवास आज शनिवारी दुसऱ्या दिवशी उत्तम प्रतिसाद लाभला.आज दिवसभर महोत्सवातील विविध विभागात, स्टॉलवर राज्यभरातून आलेल्या शेतकरी, सेवेकरी, नागरिकांची गर्दी दिसून आली.
आज विशेषत: विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांनी मोठया संख्येने प्रदर्शनास भेट दिली. बीड येथील केशर काकू क्षीरसागर कृषी महाविद्यालयाचे 650 विद्यार्थी, शिक्षक, पालक आज या महोत्सवात सहभागी झाले. या सर्वांनी त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठास सुद्धा भेट दिली.त्यांचेशी संवाद साधताना गुरुमाऊली यांनी वरील आवाहन केले.याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा हे सुद्धा उपस्थित होते.
गुरुमाऊली विद्यार्थी व उपस्थितांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, ” शेतीला अध्यात्माची जोड देऊन आपल्या प्राचीन ज्ञानाची पुन्हा उजळणी करावी लागणार आहे. नालंदा, तक्षशीला अशी विद्यापीठे आपल्याकडे होती आणि ती त्याकाळी जगभरातील अत्यंत प्रगत ज्ञान, तंत्रज्ञान शिकविणारी विद्यापीठे म्हणून जगभर प्रसिद्ध होती. येत्या काही वर्षात आपण जगाची महासत्ता होऊ परंतु अध्यात्माची विज्ञानाला जोड दिली तरच महासत्ता म्हणून छाप पाडता येईल. “
थोरामोठ्यांच्या आशिर्वादाशिवाय आज लग्न करण्याची एक पद्धत दिसून येत असून अशी लग्न अल्पायुषी ठरत आहेत. वादविवाद होऊन घटस्फोट होत आहेत. यातून विवाह विषयक नवीच समस्या उभी राहिली आहे. यातूनच मार्ग काढण्यासाठी सेवामार्गाने विवाह परिचय मेळावे, सामुदायिक विवाह सोहळे असे उपक्रम हाती घेतले असल्याची माहितीही गुरुमाऊलीनी दिली.
तज्ञांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
आज ‘विषमुक्त शेती आणि प्राचीन ते आधुनिक शेती’ या विषयांवरील चर्चासत्रात राज्यभरातून आलेल्या तज्ञांनी सहभाग घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या विषयातील अभ्यासक आबासाहेब मोरे, माऊली कापसे,पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलेचे वरिष्ठ शाश्रज्ञ् डॉ किशोर झाडे, महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक अनंत अग्निहोत्री, उद्योजक भाऊसाहेब काळे, सुरेश खिल्लारे, अजय शिरसाठ यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
Comments are closed.