NGN News
Latest Marathi News

श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषी महोत्सवाचे शानदार उदघाटन

  • भौतिक प्रगती बरोबरच आरोग्याचा ऱ्हास : नरहरी झिरवाळ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

“शेतकऱ्यांनी आज आर्थिक संपन्नता आणि भौतिक प्रगती साधली. बंगले, गाड्या, भौतिक सुखाची सर्व साधने मिळवली; परंतु त्याबरोबरच दुसऱ्या बाजूने आपण आपल्या मानसिक, शारीरिक, सामाजिक ऱ्हास होतो आहे आणि ही अत्यंत चिंताजनक बाब असल्यामुळे विषमुक्त शेतीचा गुरुमाऊलींचा मंत्र घरोघरी पोचवण्यासाठी अश्या कृषी महोत्सवांची गरज आहे “असे उदगार राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काढले.

श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आयोजित पाच दिवसीय सोळाव्या जागतिक कृषी महोत्सवाचे आज शानदार उदघाट्न महानगरातील युथ फेस्टिवल मैदानात मोठया उत्साहात संपन्न झाले. यानिमित्त ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे, राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, चंद्रकांतदादा मोरे, आयोजक आबासाहेब मोरे, मविप्रचे विश्वासराव मोरे, भाजपचे लक्ष्मण सावजी, नवनिर्वाचित नगरसेवक रिद्धीश निमसे, नगरसेविका ऐश्वर्या जेजुरकर, इंदू खेताडे, योगेश क्षेमकल्याणी, कृषी अधीक्षक अभिमन्यू काशीद, विक्रांत चांदवडकर, बापूसाहेब पिंगळे सतीश मोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

सात्विक, सेंद्रिय, अध्यात्मिक शेतीचे महत्व विषद करून मंत्री झिरवाळ पुढे म्हणाले,”आपण या कार्यक्रमात माती, बैलगाडी, नांगर, पाभारीची पूजा केली ही अत्यंत मनाला भावणारी गोष्ट असून या सर्व गोष्टींकडे पुन्हा आपल्याला वळावेच लागेल. चांगले निर्मळ, निर्भेळ सात्विक अन्न आपणास कसे मिळेल यासाठी सर्वांनीच प्रयत्नशील असायला हवे. गाड्या, बांगल्यापेक्षा पुढील पिढीचे आरोग्य आपणास जपायचं आहे. असं आवाहनही त्यांनी केले.

विषमुक्त शेतीची नितांत गरज : अण्णासाहेब मोरे

उपस्थित मान्यवर आणि सेवेकरी, शेतकऱ्यांशी संवाद साधताना गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे म्हणाले की, ” शेती आणि मानसिक, शारीरिकच नव्हे तर सामाजिक आरोग्याचा खूप जवळचा संबंध आहे. आज चुकीच्या आणि विषारी अन्नामुळं कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब आणि इतर अनेक आजार वाढले असून पुढील पिढ्याना वाचविण्या साठी विषमुक्त शेतीची नितांत गरज आहे. हा मंत्र देण्यासाठीच हा महोत्सव असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. नोकरी, व्यापारपेक्षा, शेतीच उत्तम आहे असा दिवस येईल तेव्हा खरा शेतकऱ्याचा दिवस आला असं समजावे असंही गुरुमाऊली म्हणाले.

शेकऱ्यांसमोर विविध आव्हाने… वाजे

आज शेतकऱ्यांना समोर आर्थिकच नव्हे तर इतर अनेक सामाजिक आव्हाने आज उभी असून त्यातून त्यांना धीर देऊन या संकटामधून त्यांची सुटका होण्यासाठी अश्या उपक्रमांची गरज आहे असं मत खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केले.

नेपाळहून आलेल्या सेवेकऱ्यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी रामकुंडावरून निघालेल्या कृषी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.

Comments are closed.