NGN News
Latest Marathi News

अखेरच्या टप्प्यात छुपा वैयक्तिक प्रचार; पक्षापेक्षा व्यक्तिगत कर्तृत्वावर भरवसा

  • महापालिकेचे १२२ कारभारी निवडण्यासाठी उद्या मतदान

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

प्रारंभी भाजपच्या बाजूने वाटणारी नाशिक महापालिकेची निवडणूक अखेरच्या टप्प्यापर्यंत हळूहळू बहुरंगी होत गेल्याने मतदारांमध्ये कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे. मंगळवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांनी छुपा वैयक्तिक प्रचार सुरु केल्याचे चित्र अनेक प्रभागांत दिसून आले. यामुळे निवडणूक मैदानात उतरलेल्या उमेदवारांना पक्षापेक्षा व्यक्तिगत कर्तृत्वावर भरवसा ठेवावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाशिक महापालिकेचे १२२ कारभारी निवडण्यासाठी उद्या गुरुवारी मतदान होत आहे. 31 प्रभागांतून तब्बल ७२५ उमेदवार निवडणुकीत नशीब अजमावत आहेत. भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे, तर शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस युती आणि शिवसेना ( उबाठा ), राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एसपी ), मनसे आघाडी हे दोन महत्वपूर्ण घटक मतदारांना साद घालत आहेत. याशिवाय, वंचित बहुजन आघाडी, माकप, भाकप, आम आदमी पक्ष, अपक्ष असे उमेदवारदेखील मैदानात आहेत. प्रचार काळात एकत्रित फिरणारे युती-आघाड्यांचे उमेदवार मंगळवारी प्रचार बंद झाल्यानंतर छुप्या वैयक्तिक प्रचारात गुंतलेले आढळले. मतदारांना प्रभागासाठी आपल्या वैयक्तिक योगदानाचे स्मरण करून देत, आपल्याला संधी देण्याचे आर्जव करताना अगदी मोठ्या राजकीय पक्षांचे उमेदवारही दिसले. निवडून आल्यावर पुढील पाच वर्षे ‘कनेक्टेड’ राहू, असा शब्द अनेकांनी दिल्याचे मतदारांनी सांगितले.

लक्ष्मीदर्शन’ चर्चांना उधाण..

शहरातील अनेक प्रभागांमध्ये बडे चेहरे मैदानात असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. निवडणूक उंबरठ्यावर असताना काही उमेदवारांकडून ‘लक्ष्मीदर्शन’ घडवले जात असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. विशेषतः, मंगळवारी रात्रीपासून छुपा प्रचार करताना उमेदवारांचे निकटवर्तीय या प्रक्रियेत गुंतल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात कोणतीही तक्रार वा प्रकार होत असल्याची माहिती मात्र पुढे आली नाही. पोलीस प्रशासन आणि निवडणूक भरारी पथके घडामोडींवर नजर ठेवून असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

Comments are closed.