NGN News
Latest Marathi News

समर्थ सेवामार्गाच्या कृषी महोत्सवाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन

  • पाच दिवसीय महोत्सवात शेतकरी उत्कर्षासाठी भरगच्च उपक्रम

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने 23 ते 27 जानेवारी दरम्यान नाशिक मधील युथ फेस्टिवल मैदानात होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा मोरे, आयोजक आबासाहेब मोरे,”आत्मा” चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, शिवसेनेचे संपर्क नेते अजय बोरस्ते, राजेंद्रनाना सूर्यवंशी, हेमंत पगारे, भाजप जिल्हा अध्यक्ष सुनील बच्छाव, क्षेमकल्याणी योगेश व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज सोमवारी मंगलमय वातावरणात झाले. यनिमित्ताने एक हजार महिलांनी मैदानात श्री दुर्गासप्तशती ग्रंथाचे पारायण सुद्धा केले.

गेली 15 वर्ष नियमितपणेआयोजित होणाऱ्या या महोत्सवाचे सोळावं वर्ष असून पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात शेतकरी उत्कर्ष व शेतकऱ्यांचं मनोबल वृद्धिंगत होण्यासाठी भरगच्च कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
विधवा,विधुर,घटस्फोटीत तसेच आत्महत्याग्रस्त, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मुलं-मुली,दिव्यांग आणि इतर सर्व धर्मीय विवाह इच्छुकांसाठी भव्य वधु वर मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा, स्वयंरोजगार विभागा अंतर्गत युवक, युवतीना रोजगार, नोकरी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळावा, सरपंच, ग्रामसेवक मंदियाळी, सायबर सुरक्षा मार्गदर्शन,शेतकऱ्यांच्या उन्नती साठी झटणाऱ्यांना कृषी माऊली पुरस्कार, दुर्मिळ वनौषधी प्रदर्शन अश्या विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी यानिमित्त दिली.

गेली 15 वर्ष या जागतिक कृषी महोत्सवात सातत्याने लाखो शेतकरी, तज्ज्ञ, सामाजिक संस्था, विद्यार्थी, कृषीशी संबंधित उत्पादक, कंपनी, संशोधक, अभ्यासक भेट देत असतात. गत वर्षी पाच लाख व्यक्तींनी या महोत्सवात हजेरी लावली होती. या वर्षी निश्चितच यापेक्षा ज्यादा संख्येने लोक भेट देतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून येथे दरवर्षी प्रमाणे प्रवेश मोफत आहे.

अधिक माहिती देताना आबासाहेब मोरे म्हणाले की गुरुमाऊली परमपूज्य अण्णासाहेब मोरे यांनी आतापर्यंत महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर हजारो शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचा उत्कर्ष कसा साधता येईल यावर सातत्याने चिंतन केले आहे. विषमुक्त शेती कशी करता येईल याबाबत सातत्याने गेली पन्नास वर्ष मार्गदर्शन केलं आहे.

आज शेतकऱ्यांच्या मुला मुलींचा विवाह ही एक मोठी समस्या बनली आहेत पण या बरोबरच विविध आजार,अपघात यामुळे येणारे एकाकीपण आणि संस्कारा अभावी व मार्गदर्शनाअभावी घडणारे मोठ्या प्रमाणातील घटस्फोट यामुळे विवाह समस्या अधिक गडद झाली आहे.अपेक्षित वयात मुला मुलींचे विवाह होत नसल्यामुळे ही एक मोठी सामाजिक समस्या आज आपल्या सर्वांना भेडसावत आहे.याबरोबरच खोट्या प्रतिष्ठा जपण्यासाठी शेतकरी कर्जबाजारी होतात आणि आपल्या मुला-मुलींच्या लग्नकार्यात लाखो रुपये खर्च करून शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.या सर्वच गोष्टींवर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सातत्याने शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. विवाह ही अत्यंत गुंतागुंतीची समस्या समाजासमोर आज उभी असताना यातून मार्ग काढण्यासाठीच या जागतिक कृषी महोत्सवात 24 जानेवारी रोजी विधवा, विधुर, घटस्फोटीकांसाठी तर 25 जानेवारी रोजी विवाह इच्छुक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आणि 26 जानेवारी रोजी सर्वच जाती-धर्मीय शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी आणि सर्वांसाठीच वधुवर परिचय मेळावा आयोजित केला आहे.

याशिवाय 23 ते 27 जानेवारी दरम्यान जागतिक कृषी महोत्सवात विवाह संस्कार विभागाच्या दालनामध्ये पाचही दिवस सर्वांसाठीच वधू वर नाव नोंदणी आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. यापैकी ज्या इच्छुकांचे विवाह जमणार आहेत त्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह वैदिक पद्धतीने संपन्न होणार आहे. या आधीच्या जागतिक कृषी महोत्सवात दरवर्षी अनेक विवाह संपन्न झाले आहेत म्हणून या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी इच्छुकांनी आपल्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात किंवा दिंडोरी येथील प्रधान केंद्रात किंवा श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

23 तारखेला सकाळी 11 वाजता रामकुंड ते कार्यक्रम स्थळापर्यंत कृषी दिंडी निघेल आणि दुपारी 3 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाट्न सोहळा होईल. रोज सकाळी व सायंकाळी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सत्र, मेळावे, कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.

Comments are closed.