NGN News
Latest Marathi News

मूल्यवर्धन, संयम आणि सातत्यातूनच उद्योजक घडतो : संजय घोडावत

एनईएफ 26 या उद्योजक परिषदेत प्रतिपादन; गुंतवणूकदार व विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी

नाशिक | एनजीएन न्यूज नेटवर्क

मूल्यवर्धनाशिवाय उद्योजकता शक्य नसून संयम आणि सातत्य हे यशस्वी उद्योजकतेचे दोन मूलभूत स्तंभ असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक, घोडावत ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष संजय घोडावत यांनी केले.

नाशिक येथे नाशिक अंत्रपृनर फेडरेशन तर्फे आयोजित एनईएफ 26 या उद्योजक परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयोजक उद्योजक संजय लोढा, अजय बोहरा, विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उद्योजक विनोद दुगड व मुकेश व्होरा यांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्योजक संजय घोडावत यांनी उद्योजकतेचा खरा अर्थ उलगडत उपस्थित उद्योजकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले

आपल्या भाषणात संजय घोडावत म्हणाले की, “दहा रुपयांची वस्तू अकरा रुपयांना विकणे म्हणजे व्यवसाय. मात्र त्याच वस्तूला मूल्यवर्धन करून पन्नास रुपयांची बनवणे म्हणजे उद्योजकता. जो मूल्य निर्माण करतो, तोच खरा उद्योजक असतो.” उद्योजकतेमागील विचारसाखळी स्पष्ट करताना त्यांनी देव, विश्व, ऊर्जा, मानव, स्वप्ने, ध्येय, अडचणी, उपाय आणि शिक्षण यांमधून विचार, सवय, स्वभाव, वृत्ती, व्यक्तिमत्त्व आणि अखेरीस नियती घडते, असा संदेश दिला.
उद्योजकतेतील दोन ‘पी’ — Patience (संयम) आणि Perseverance (सातत्य) यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या गुणांशिवाय कोणतेही दीर्घकालीन यश शक्य नाही. योग्य मार्गदर्शक मिळाल्यास उद्योजकांची वाटचाल अधिक भक्कम होते, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. प्रवीण गेडाम यांनी उद्योजकतेला देशाच्या प्रगतीची खरी दिशा असल्याचे प्रतिपादन केले. “मानवाच्या इतिहासात ज्या प्रदेशात उद्योजकता बहरली, तेच प्रदेश प्रगत झाले. नैसर्गिक साधनसंपत्ती कमी असली तरी उद्योजकता मजबूत असेल, तर विकास थांबत नाही,” असे त्यांनी सांगितले. तरुणांनी केवळ सरकारी नोकरीकडे न पाहता रोजगारनिर्मितीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिकच्या आर्थिक व औद्योगिक विकासाचा आढावा घेताना नवोन्मेष आणि स्पर्धात्मकतेची गरज अधोरेखित केली. नाशिक हे संरक्षण उद्योग, उत्पादन, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन क्षेत्रात वेगाने पुढे जात असून, ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅड वाढवण्यासाठी स्थानिक नवोन्मेष आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकच्या भविष्यातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांची माहिती देताना त्यांनी नाशिक ग्रीन रोड व विमानतळ विस्तार प्रकल्पाचा उल्लेख केला. सुमारे ६५ किलोमीटर लांबीचा ग्रीन रोड प्रकल्प पूर्ण झाल्यास शहराचा विस्तार सुमारे ५० टक्क्यांनी वाढेल, तर विमानतळ क्षमतेत तिपटीने वाढ झाल्याने उद्योग, निर्यात व गुंतवणुकीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजय लोढा यांनी सांगितले की, उदयोजक परिषद गेली 15 वर्ष सातत्याने घेत असून, नाशिकच्या विकासात हातभार लावणारे अनेक उदयोजक या माध्यमातून घडले असल्याचे ते म्हणाले.

उद्योजक, स्टार्टअप प्रतिनिधी, गुंतवणूकदार व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या कार्यक्रमातून नाशिकच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळेल, अशी भावना संजय लोढा यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात उपस्थित व मार्गदर्शन करणाऱ्या मान्यवरांमध्ये दीपक चंदे, सतीश पारख, देवांश जैन नवल, संजय कथुरिया, इप्सिता दास, कॅप्टन निकुंज पराशर, पल्लवी दराडे (आयएएस), देवश्री चांदे, शशांक खेतान, श्रेया घोडावत, मुकेश व्होरा, विनोद दुगड, मुबंई बॉम्ब स्फोट प्रसंगी महत्वाची कामगिरी करणारे निवृत्त पोलीस अधिकारी हेमंत बावधणकर अधिकारी यांचा समावेश होता.

Comments are closed.