NGN News
Latest Marathi News

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; डझनभर ‘बिग फाईटस’मुळे रंगत वाढली

  • महापालिका निवडणूक २०२६ : बहुतांश प्रभागात भाजप विरुध्द शिवसेना असा सामना

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

महापालिका निवडणुकीतील चित्र आता स्पष्ट झाल्यानंतर मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी रंगत वाढत आहे. शहरातील काही प्रभागातील लढती ‘बिग फाईटस’ श्रेणीत असल्याने रंगत वाढली आहे. स्वाभाविकच निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बहुतांश प्रभागात भाजप विरुध्द शिवसेना असा सामना होत असल्याने निकालाबाबत उत्कंठा वाढली आहे.

नाशिक महापालीकेच्या 31 प्रभागांत १२२ जागांसाठी लढत होत आहे. स्वबळावर लढणाऱ्या भाजपने सर्वाधिक ११८, शिवसेनेने १०२ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ४२ जागी उमेदवार उभे केले आहेत. विरोधी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना ( उबाठा ) ने ७९, राष्ट्रवादी कॉंग्रेस ( एसपी )ने 31, मनसेने ३० तर कॉंग्रेसने २२ जणांना उमेदवारी दिली आहे. यापैकी काही प्रभागात विलक्षण अटीतटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हिरे विरुध्द बोरस्ते

आ. सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे विरुद्ध शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्यात प्रभाग क्र. ७ मध्ये प्रतिष्ठेची लढाई होणार आहे. हिरे यांच्यासाठी आ. सीमा हिरे स्वतः मैदानात उतरल्या आहेत, तर बोरस्ते यांना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाठबळ लाभल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. याच प्रभागात आ. डॉ. राहुल आहेर यांच्या भगिनी हिमगौरी आडके यांच्यापुढे शिवसेनेच्या रोहिणी शिरसाठ यांनी आव्हान उभे केल्याने ही लढतही लक्षवेधी ठरणार आहे.

पाटील विरुध्द पाटील

सातपूरमधील प्रभाग क्र. ९ मध्ये माजी महापौर दशरथ पाटील यांचे सुपुत्र प्रेम पाटील विरुद्ध माजी सभागृहनेते दिनक्र पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील या चुलत बंधूंमध्ये लढत होत आहे. प्रेम हे शिवसेनेकडून तर अमोल भाजपकडून मैदानात आहेत. येथे स्वतः दिनकर पाटील हेदेखील भाजपकडून नशीब अजमावत आहेत.

खैरे विरुध्द मोरे

जुने नाशिकमधील प्रभाग क्र. १३ मधील पक्षांतर सर्वत्र गाजले असल्याच्या पार्शभूमीवर माजी स्थायी समिती सभापती शाहू खैरे ( भाजप ) यांच्यापुढे भाजप मधून शिवसेनेत गेलेल्या गणेश मोरे यांनी आव्हान उभे केले आहे. याच प्रभागात माजी महापूर विनायक पांडे यांच्या स्नुषा आदिती पांडे विरुद्ध कॉंग्रेसच्या वत्सला खैरे, भाजपच्या बबलू शेलार विरुध्द शिवसेनेचे संजय चव्हाण, हा सामनाही चर्चेतील आहे.

इतर प्रभागही चर्चेत..

याशिवाय, प्रभाग क्र. १ मध्ये माजी महापौर भाजपच्या रंजना भानसी विरुद्ध शिवसेनेचे गणेश चव्हाण, प्रभाग क्र. ५ मध्ये माजी महापौर शिवसेनेचे अशोक मुर्तडक विरुध्द गुरमित बग्गा, प्रभाग क्र. २९ मध्ये भाजपचे दीपक बडगुजर विरुध्द भाजप बंडखोर अपक्ष मुकेश शहाणे, प्रभाग क्र. २५ मध्ये शिवसेनेतून भाजपात आलेले सुधाकर बडगुजर विरुध्द शिवसेनेचे अतुल सानप, प्रभाग १५ मध्ये माजी उपमहापौर शिवसेनेचे प्रथमेश गीते विरुध्द भाजपचे मिलिंद भालेराव, प्रभाग क्र. २४ मध्ये शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे विरुद्ध भाजपचे कैलास चुंभळे तर प्रभाग क्र. ३० मध्ये भाजपचे अजिक्य साने विरुध्द राष्ट्रवादीचे सतीश सोनवणे यांच्यातील लढतीही शहरवासीयांच्या औत्सुक्याचा विषय बनला आहे.

Comments are closed.