NGN News
Latest Marathi News

‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ते आंतरराष्ट्रीय सहकार’ विचारसंवाद उत्साहात

  • आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने उपक्रम

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५–२६ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था व जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ते आंतरराष्ट्रीय सहकार – महिला बचत गट विचारसंवाद” या अभिनव व प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात महिला बचत गटातील महिलांनी चिठ्ठीद्वारे मिळालेल्या विषयावर दोन ते पाच मिनिटांत उस्फूर्तपणे आपले विचार मांडले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक विचारांचा वारसा, सहकाराची मूल्ये आणि महिला बचत गटातील स्वतःचे जीवनानुभव यांचा सुंदर संगम या विचारसंवादात अनुभवायला मिळाला. हा उपक्रम भाषण स्पर्धा न ठेवता महिलांना आत्मविश्वासाने व्यक्त होण्यासाठीचा मुक्त विचारमंच ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अश्विनी अशोक बोरस्ते, संस्थापक अध्यक्षा – नाशिक जिल्हा महिला व बचत गट विकास सहकारी पतसंस्था होत्या. यावेळी ॲड. जयश्री दळवी, संस्थापक अध्यक्ष – जिजाऊ महिला सेवाभावी संस्था, या प्रमुख उपस्थित होत्या. बचत गटाच्या मुख्य समन्वयक मीनाक्षीताई शिंदे व संगीताताई मोतमल, तसेच जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या संचालिका शितलताई महाजन आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा संदेश तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे, सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि महिला सक्षमीकरणाला बळ देणे हा या विचारसंवादाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात सहभागी सर्व महिलांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये सौ. निर्मला वसंत पवार, सौ. ज्योती अंतेश्वर देवकते, सौ. भावना संजय शिंदे, सौ. अंकिता अतिश अहिरे, सौ. कलावती ज्ञानेश्वर देवकाते, सौ. सुनीता विजय मोरे, सौ. मीनाक्षी भास्कर शिंदे, सौ. संगीता सुनील मोतमल, सौ. शितल अमरीश महाजन, सौ. शीतल राजेश बागुल, सौ. दिपाली मुकणे यांच्यासह दर्शन युवराज, सतीश मच्छिंद्र साळवे आणि अखिलेश अशोक बोरस्ते यांचा सहभाग उल्लेखनीय ठरला.

सर्व सहभागी, आयोजक, समन्वयक व उपस्थित मान्यवरांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या विचारसंवादामुळे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन सहकार चळवळीला नवे बळ मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Comments are closed.