NGN News
Latest Marathi News

निष्ठा विरुद्ध सत्ता : बदललेल्या भाजपची वास्तवकथा ! ( सारीपाट/ मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही.. भाजपमध्ये भ्रष्टाचारी खड्यासारखे बाजूला करू.. भाजपमध्ये गुन्हेगार औषधालाही नसतील.. पक्षनिष्ठा हाच भाजपमधील निवडणूक निकष.. आधी राष्ट्र, मग बाकी सारे.. सबका साथ, सबका विकास…

२०१४ मध्ये देशात मोदीपर्व सुरु झाल्यानंतर दिल्लीदरबारी आळवले जाणारे उपरोक्त सूर अगदी गल्लीबोळातील भाजप कार्यकर्त्यांच्या तोंडी ऐकू आल्याचे विस्मरण होण्याचे कारण नाही. वाजपेयी पर्वाची काही वर्षे वगळता आसेतु हिमालयी सत्तेची ऊब अनुभवलेल्या काँग्रेसी विचारसरणीच्या नावे बोटे मोडत ‘पार्टी विथ डिफरन्स’च्या आव आणणाऱ्या भाजपमध्ये आज जे चाललेय, ते पाहून पक्षाच्या कठीण काळात खस्ता खाल्लेल्या, संघर्ष केलेल्यांच्या डोळ्यांत अश्रू साठत असल्यास नवल नाही. गेल्या काही काळातील निवडणुका, राजकीय खेळी आणि सत्तासंघर्षातील चढ-उतार अभ्यासल्यास किमान भाजपने तत्वाधिष्ठित राजकारणाशी फारकत घेतल्याचे स्पष्ट होते. आताच्या महापालिका निवडणुकांत या सगळ्या गोष्टीनी तर कळस गाठल्याचे म्हणता येईल.

नाशिक महापालिकेत पुन्हा दिग्विजयी सलामी देण्याच्या दृष्टीने भाजपने राजकीय रणनीतीची सगळी अस्त्रे बाहेर काढली आहेत. गेल्या वर्षभरापासून ‘शंभर प्लस’ चा नारा देण्यातून पक्षाने कार्यकर्त्यांत ‘जान’ आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यापोटी आधी विरोधकांना विकलांग केले, पाठोपाठ महायुतीच्या नावाखाली सवंगडी पक्षांना गाफील ठेवले आणि अखेर स्वबळाचे खड्ग उपसले. या घडामोडीत पक्ष नेतृत्वाने जनता आणि स्वकीयांना ‘गृहीत’ धरले. पक्ष बळकटीकरणाच्या नावाखाली अनेक वादग्रस्त, सत्तातुरांना आलिंगन देवून आपलेसे केले. घराणेशाही नको, पण ती केवळ आमदार-खासदारांपुरती; इतरांना त्त्यामधून मुभा देण्याचे दातृत्व नेतृत्वाने दाखवले. एकीकडे आमदारांच्या वारसांना माघारी येण्याचा फतवा काढताना दुसरीकडे शहरातील तीन परिवारांत प्रत्येकी दोघांना उमेदवारी देताना पक्षाने निष्ठेला हरताळ फासला. भविष्यात, भाजपचा ‘डाऊनफॉल’ सुरु झाला तर वाऱ्याच्या दिशेप्रमाणे निष्ठा बदलणारी ही मंडळी पक्षाला वाऱ्यावर सोडण्यात आघाडीवर असतील, हे सांगणे नको.

बरं, गंभीर बाब म्हणजे पक्षाने इच्छुकांसाठी केलेला ‘सर्व्हे’ बाजूने अथवा विरोधात आहे, याचा हिसाबकिताब केवळ तोंडी स्वरुपात सांगण्यात आला. ना आकडेवारी, ना राबवली गेलेली प्रक्रिया, ना अन्य काही असे घटक स्पष्ट करण्याची नेतृत्वाने तमा बाळगली, ज्यामुळे किमान आपल्याला का नाकारले गेले, याचे भान संबंधिताना यावे. परंतु, नापसंतीची मोहोर उमटवताना सर्व्हेत अमुक एक बाब विरोधात असल्याची बाब बिंबवण्यात आली. कितीही दुर्लक्ष केले, कितीदाही उमेदवारी कापली तरी निष्ठावंत पक्ष सोडून जाणार नाही, हे गृहीतक नेतृत्वाला ठाम विश्वास देवून गेले. आज बहुधा सत्तेच्या जोरावर काही गोष्टी निभावून नेण्याचे समाधान पक्षातील कारभाऱ्यांना सुखावणारे ठरेल. पण पक्ष उभारणीसाठी ज्यांनी खरोखर योगदान दिले पण इतरांच्या चांगभल्यासाठी अन्यायाचा ठेवा वाटेला आलाय, त्यांच्या मनात बंडाचे बीजारोपण झाले नसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

निवडणुकीच्या दोन-चार महिने आधी गुन्हेगारांना तिकिटे देणार नाही, असा रव मुख्यमंत्र्यांपासून प्रदेश कारभाऱ्याच्या तोंडी वारंवार उमटत होता. त्याचे पालन झाले खरे; पण तशा पार्श्वभूमीच्या व्यक्तींना वगळून भाजपने त्यांचे वारस शोधले. नाशिकमध्ये एक इच्छुक तुरुंगाची हवा खात असताना त्यांचे सुपुत्र पक्षाचे उमेदवार झाले. अजून किमान डझनभर अशाच कमी-अधिक पार्श्वभूमीचे वारसदार उमेदवारीसाठी निवडून पक्षाने सर्वव्यापकतेचे दर्शन घडवले आहे. भाजपच्या या धोरणाची ‘री’ शिन्देसेना, रिपाइं आणि अन्य काही पक्षांनी ओढल्याने किमान या मुद्द्यावर भाजपवर टीका करण्याचे अधिकार ते तूर्तास गमावून बसलेत.

सारांशात, सत्तातूर भाजपला स्वबळच अजमावयाचे होते, याचा नेतृत्वाने सवंगडी पक्षांना अदमास येवू दिला नाही. नाशिकपुरता बोलायचे तर शिन्देसेना वगळता भाजपच्या लेखी इतर दखलपात्र राजकीय शक्ती नव्हत्या. म्हणूनच तिकीट वाटपात नाराजीनाट्य उभे राहिले तरी निर्मित उपद्रवमूल्य दखलपात्र नसेल, असा पक्षाचा होरा होता. उमेदवारी यादी जाहीर न करता थेट ‘एबी’ अर्ज योग्यतेच्या व्यक्तीकडे देण्याची खेळी पक्षाने केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ‘वसंतस्मृती’ला फाटा देत पंचतारांकित हॉटेलातून कारभार हाकण्याची दूरदृष्टीही बदलत्या भाजपचा नमुना सादर करून गेली. एकूणच भाजप अमुलाग्र बदलला आहे, याची प्रचीती देणारी महापालिका निवडणूक पक्षाच्या प्रतिमेला ‘सहस्त्रदा’ तडा देणाऱ्या बाबींची उकल करून गेली, इतकेच !

सबकुछ फडणवीस..

राज्यातील महापालिका निवडणुकीत येनकेन प्रकारे बाजी मारण्याच्या निर्धाराने पेटून उठलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपची मंडळी पेटून उठलेली दिसली. ‘साम-दाम-दंड-भेद’ या रणनीतीचा अवलंब करा आणि सत्ता आणा, हे धोरण राजकीयदृष्ट्या योग्य असले तरी तात्त्विक अंगाने कितपत व्यवहार्य आहे, हा वादाचा विषय ठरावा. महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री साताऱ्यात सारस्वतांच्या दरबारी विराजमान झालेले असताना सातत्याने कानाला भ्रमणध्वनी लावून कधी हसऱ्या मुद्रेत तर कधी सचिंत झालेले दिसून आले. तेथील भाषणात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच उलगडा करीत ‘पक्षातील बंडखोरांची समजूत काढत होतो’ अशी वस्तुस्थिती स्पष्ट केली. याचा अर्थ पक्षाने नाकारलेले केवळ राज्याच्या कारभाऱ्याचेच ऐकतात, इतरांचे नाही.. असा एक संदेश राज्यभर गेला. देशात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र म्हणतात ते उगीच नाही. अकरा वर्षांपूर्वी मराठी मुलखाच्या क्षितिजावर उगवलेला देवेंद्र नामक तारा किती प्रभावी राजकारण करतो, याचा अंदाज सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना यानिमित्त आला असणार !  

Comments are closed.