तीन परिवारांसाठी भाजपकडून प्रत्येकी दोन उमेदवाऱ्या देण्याचे दातृत्व
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आमदार-खासदारांच्या आप्तस्वकीयांना तिकिटे आणि घराणेशाहीला थारा नको म्हणणाऱ्या भाजपचे नाशिकमध्ये भलतेच धोरण समोर आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी १२२ जागा असताना इच्छुकांची संख्या हजारावर पोहोचल्याचा दावा करणाऱ्या या पक्षाने अनेक निष्ठावंतांना ‘कात्रजचा घाट’ दाखवताना दुसरीकडे मात्र तीन परिवारांसाठी नियमोल्लंघन करीत प्रत्येकी दोन उमेदवाऱ्या देण्याचे दातृत्व दाखवले आहे. विशेष म्हणजे, स्थानिक आमदारांना थेट विरोध केलेल्यांना टाकलेले हे ‘रेड कार्पेट’ निष्ठावंतांना बुचकळ्यात टाकणारे आहे.
नाशिक महापालिकेची सत्ता कोणत्याही परिस्थितीत राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भाजपने विविध प्रकारची रणनीती अवलंबली. त्यामध्ये सत्ता मिळवायची तर वाटेकरु नकोत म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पत्ता काटून महायुतीला छेद दिला. त्याआधी निवडून येण्याची क्षमता असलेल्या इतर पक्षांतील अनेकांना कमळावर स्वार करून घेत त्यापैकी बहुतेकांच्या उमेदवारीची सोय केली. पक्षात आता ‘हाउसफुल’चा बोर्ड लावण्याची वेळ आलीय म्हणणारे मंत्री गिरीश महाजन यांना मात्र उमेदवारी बहाल करताना निर्माण झालेला असमतोल ध्यानी आला नाही. सतीश सोनवणे, शशी जाधव, वर्षा भालेराव, प्रशांत जाधव या निष्ठावंत मंडळीसह इतर पक्षातून येताना ‘शब्द’ दिलेल्या अनेकांना उमेदवारी यादीतून डावलण्यात आले. गतवेळच्या २२ शिलेदारांना घरी बसवण्याची हिम्मतही भाजपने दाखवली. मात्र, शहरातील तीन परिवारांतील प्रत्येकी दोघांना उमेदवारी देवून पक्षाने अनेकांची ‘उमेद’ घालवली.
शिवसेना उबाठा पक्षातून आलेल्या सुधाकर बडगुजर यांना पुत्र दीपक यांच्यासह उमेदवारी देण्यात आली, तर ऐनवेळी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ ठोकत कमळावर विसावलेल्या दिनकर पाटील आणि पुत्र अमोल यांच्या उमेदवारीवर मोहोर लगावण्यात आली. काळानुरूप विविध पक्षांची ऊब अनुभवलेल्या चुंभळे परिवारही भाजप नेतृत्वाची पसंती ठरला. त्यांच्यातील कल्पना चुंभळे आणि त्यांचे दीर कैलास यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी बडगुजर आणि पाटील यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून आ. सीमा हिरे यांच्याविरोधात वेळोवेळी शड्डू ठोकला आहे. केवळ ‘इलेक्तीव मेरीट’ आणि ‘पक्षांतर्गत सर्व्हे’ची ढाल पुढे करत भाजप नेतृत्वाने प्रत्येकी दोन उमेदवाऱ्या देण्याचे दातृत्व या परिवारांबद्दल दाखवल्याची कुजबुज पक्षात सुरु आहे.
याव्यतिरिक्त सबळ राजकीय पार्श्वभूमी असलेल्या आणि इतर पक्षांतून आलेल्या अनेकांना उमेदवारीचे द्वार उघडून देण्यात आले. यामध्ये प्रशांत दिवे, योगिता हिरे, राजेंद्र महाले, आदिती पांडे, शाहू खैरे, बबलू शेलार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यामधील अनेक जण राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांचे वारसदार आहेत. त्यांच्या-त्यांच्या प्रभागातील प्राबल्य पाहून भाजपने काहींना काही महिने आधी तर काहीना ऐनवेळी समाविष्ट करून घेत उमेदवारी देण्याचे सोपस्कार पार पडले. अर्थात, हे करताना अनेक वर्षांपासून पक्षनिष्ठा राखून असलेल्यांच्या भावना अव्हेरल्या गेल्या, हे मात्र निश्चित.
Comments are closed.