NGN News
Latest Marathi News

सत्ताधाऱ्यांत मेगाभरतीने सुगी, निष्ठावंतांची ‘उमेद’ मात्र होतेय नाहीशी !

  • भाजप आणि शिवसेनेत येण्यासाठी विरोधकांची अक्षरशः रीघ

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

केंद्र-राज्यातील सत्ता, अलीकडील नगर परिषद निवडणुकांतील मोठा विजय आणि महापालिकेत विजयाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता या बाबींमुळे सत्तेतील भाजप तसेच शिवसेनेला सुगीचे दिवस आले आहेत. विरोधी शिवसेना ( उबाठा ), कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांची या दोन पक्षांत येण्यासाठी अक्षरशः रीघ लागली आहे. ऐन निवडणूक तोंडावर असताना आयारामांचे होत असलेले आक्रमण उमेदवारीची अपेक्षा बाळगून असलेल्या निष्ठावंतांना मात्र अस्वस्थ करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभागनिहाय एका जागेसाठी अर्धा डझन इच्छुक पक्षातीलच असताना बाहेरून येणाऱ्यांना कसे सामावून घेतले जाईल, या विचाराने निष्ठावंत हैराण झाले आहेत.

महापालिका निवडणूक येनकेन प्रकारे जिंकण्याचे भाजपचे गणित आहे तर महायुती सन्मानजनक जागा मिळाल्या तरच करायची, या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. हे दोन्ही पक्ष तिसरा भागीदार राष्ट्रवादी कॉंग्रेसला फार हिशेबात धरत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. कारण दोन्ही पक्षातील इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना चर्चेसाठी टाळत असल्याने या पक्षाच्या नेत्यांनी मुंबई गाठून श्रेष्ठींना हस्तक्षेपाची गळ घातली आहे. मोठा भाऊ म्हणून भाजप सत्तेतील भागीदार शिवसेनेला जागांचा विशिष्ट कोटा देण्याबाबत तयार असला तरी शिवसेनेला तो फारसा मान्य नाही. यावर आता नेमका काय तोडगा निघतो, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

दुसरीकडे, शिवसेना ( उबाठा ) आणि मनसे यांची युती झाल्याची घोषणा होत नाही तर नाशकात शिवसेना ( उबाठा ) पक्षाला जोरदार झटका बसला आहे. पक्षाचे विनायक पांडे आणि यतीन वाघ हे दोन माजी महापौर गुरुवारी भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे आणि शिवसेना (उबाठा) चे संजय चव्हाण यांही कमळ हाती घेतले. दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस सोडलेल्या राहुल दिवे आणि आशा तडवी या माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेशास विरोध झाल्याने त्यांनी शिवसेनेची वाट धरली. मंत्री गिरीश महाजन यांच्या दाव्यानुसार, भाजपमध्ये प्रवेशासाठी मोठी रांग शिल्लक आहे. त्यामुळे अगदी मोक्याच्या क्षणी आणखी काही प्रवेश होऊ शकतात. भाजपनंतर अनेक जणांना शिवसेनेचा पर्याय सुरक्षित वाट असल्याने उमेदवारीचा शब्द घेवून ते प्रवेशासाठी त्या पक्षाला पसंती देत आहेत.

दोन्ही पक्षांतील निष्ठावंत अस्वस्ठ

भाजप आणि शिवसेनेत होत असलेली मेगाभरती नेतेमंडळीना सुखावणारी असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षनिष्ठा कायम ठेवून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असलेल्या निष्ठावंतांमध्ये मात्र प्रचंड खदखद आहे. आयारामांना प्रवेश देताना निवडून येण्याच्या क्षमतेचा निकष लावला जात असला तरी निष्ठेला कवडीमोल किंमत नसल्याची खंत अनेकांना अस्वस्ठ करीत आहेत. आयारामांना पक्षात घेताना प्रभागातील मूळ इच्छुकांना विश्वासात घेतले जात नाही, असा संताप अनेकांनी व्यक्त केला. याचे परिणाम उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया उमटण्यात होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.