- शिवसेना (उबाठा ), मनसे, कॉंग्रेस, वंचित, डावे पक्ष मोट बांधणार
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक महापालिका निवडणुकीत सत्तेतील भागीदारांना झुलत ठेवत स्वबळाची तयारी केलेल्या भाजपला सत्ता राखण्याची आस लागलेली असतानाच शहरातील अवघे विरोधक एकवटले आहेत. मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी माहिती दिल्याप्रमाणे भाजपला पराभूत करून लोकशाही मुल्ये जिवंत ठेवण्यासाठी शिवसेना (उबाठा ), मनसे, वंचित, डावे पक्ष यांनी मोट बांधली आहे. विरोधकांचे जागावाटप चार दिवसांपूर्वीच निश्चित झाल्याची माहिती देताना निवडणुकीत आमची आघाडी महायुतीला सक्षम पर्याय ठरण्याचा दावा पाटील यांनी केला.
येत्या १५ जानेवारी रोजी नाशिक महापालिकेचे कारभारी निवडण्यासाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि विरोधकांची आघाडी यांच्यात खलबते सुरु आहेत. महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना केवळ चर्चेच्या परिघात गुंतवून ऐनवेळी स्वबळ अवलंबण्याची खेळी खेळली जाण्याची दाट शक्यता आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत ताणले जाण्याची अधिक शक्यता आहे. यासंदर्भात एक-दोन दिवसांत चित्र स्पष्ट होणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, विरोधकांना हलक्यात घेणाऱ्या भाजप नेतृत्वाला धडा शिकवण्यासाठी विविध पक्षीयांनी वज्रमुठ आवळली आहे. यामध्ये शिवसेना (उबाठा ) आणि मनसे या पक्षांनी पुढाकार घेतला आहे. जागावाटपात निवडून येण्याची क्षमता असलेल्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. यावर चार दिवसांपूर्वीच निश्चित धोरण आखले गेल्याची माहिती दिनकर पाटील यांनी दिली.
भूमिका जाहीर करण्याची भाजपकडे मागणी
निवडणुकीत विरोधक एकवटले असताना सत्तेतील महायुती घटकपक्षांतील गोंधळ मात्र संपलेला नाही. भाजपच्या वतीने इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर शिवसेनेला पंचेचाळीस जागा हव्या आहेत. याबाबत भाजप शहर जिल्हाध्यक्ष सुनील केदार आणि शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांच्यात कोणत्याही निर्णयाविना चर्चा झाली. शिवसेनेचा चेंडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात गेला असून त्यावर एक-दोन दिवसांत शिंदे हे भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला देखील ४० जागांची अपेक्षा असल्याची माहिती पुढे आली आहे. पक्षातर्फे समीर भुजबळ, आ. दिलीप बनकर, हिरामण खोसकर, सरोज आहिरे, रंजन ठाकरे हे चर्चेसाठी मुंबईत गेल्याची माहिती आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजप नेतृत्वाकडे तातडीने निर्णय घेण्यचा तगादा लावला आहे. यावर भाजप आता काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून राहणार आहे.
.. तर तिरंगी लढत ?
भाजपची स्वबळाची तयारी लक्षात घेता शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला महायुती म्हणून अपेक्षित असलेल्या जागा मिळणे अशक्यप्राय वाटत आहे. म्हणूनच तूर्तास नाशिकपुरती महायुती होण्याची शक्यता धूसर वाटत आहे. सध्याची स्थिती बघता शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येवून वेगळी चूल मांडू शकतात. तसे झाल्यास भाजप, शिवसेना-राष्ट्रवादी आणि उर्वरित विरोधक अशी तिरंगी लढत होणे अपरिहार्य होईल. या लढतीत मतविभाजनाचा नेमका लाभ कोणाला होईल, हे पाहणेही महत्वाचे ठरेल.
Comments are closed.