वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असताना नव्या अध्यायाने डोके वर काढले
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
पंचवटीच्या तपोवन परिसरातील नऊ मंदिरांना महापालिका प्रशासनाने नोटीसा बजावल्या आहेत. या प्रकारामुळे तीनही आखाड्यांचे साधू-महंत संतप्त झाले असून प्रसंगी आंदोलन छेडण्याचा तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात या खड्यांचे महंत शहरात येवून प्रशासनासोबत बैठक घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच वृक्षतोडीचा मुद्दा राज्यभर गाजत असताना या नव्या अध्यायाने डोके वर काढले आहे. महापालिका प्रशासनाने तपोवन परिसरातील नऊ मंदिरांना नोटीसा बजावल्याने साधू-महंतांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तीनही आखाड्यांच्या महंतांनी त्याची गंभीर दखल घेत प्रशासनाविरोधात भूमिका घेण्याची तयारी दर्शवली आहे. या नोटिशीद्वारे मंदिराच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित होऊ शकणार असल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा प्रशासन कसा सामना करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या मंदिरांना नोटीसा..
लक्ष्मीनारायण बडा मंदिर, श्री साक्षी गोपाळ मंदिर, तपोवन विहार, श्री पर्णकुटी, सर्वधर मंदिर, रामपर्णकुटी, जनार्दन स्वामी मंदिर, शूर्पणखा मंदिर आणि वृद्धाश्रमातील श्रीराम मंदिर या तपोवनातील मंदिरांना प्रशासनाने नोटीसा पाठवल्या आहेत.
महंतांचा गर्भित इशारा..
दरम्यान, मंदिरांना नोटीसा बजावल्याने साधू-महंतांनी संताप व्यक्त केला आहे. दिगंबर आखाड्याचे महंत रामस्नेहीदास महाराज यांनी याप्रकरणी प्रशासनाचा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत नोटीसा मागे न घेतल्यास आंदोलन उभारण्याचा तसेच न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. यासंर्भात, निर्मोही अनि आखाडा, निर्वाणी अनि आखाडा आणि दिगंबर आखाडा यांचे महंत नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत.
नोटीसा मागे घेणार ?
मंदिरांना नोटीसा दिल्यानंतर उमटलेली तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेता महापालिका प्रशासन नोटीसा मागे घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नोटीसा चुकून पाठवल्या गेल्याची प्रतिक्रिया प्रशासकीय वर्तुळातून मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed.