कार्यकर्त्यांमधील उत्साहापोटी महायुतीतील भिडूच परस्परांसमोर ठाकण्याची चिन्हे
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
राज्यातील सर्व महापालिका निवडणुका एकत्र लढण्यावर महायुतीमधील तीनही घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याचे शीर्षस्थ नेत्यांनी जाहीर केले आहे. तथापि, महापालिकेइतक्याच राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत कोणतीही ठाम भूमिका जाहीर न केल्याने त्या नगर परिषद निवडणुकांप्रमाणे स्वबळावर लढल्या जाण्याची शक्यता गडद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कार्यकर्त्यांमधील उत्साह टिकवून ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी महायुतीमधील भिडूच परस्परांसमोर ठाकण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील २४६ नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांतील वाद टोकाला पोहोचला आहे. प्रचारसभादरम्यान, दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. अधिक तणातणी होवून महायुतीवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांनी गळ्यात गळा घालत महापालिका निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात तशी घोषणा न केल्याने त्यामधून अव्यक्त स्वबळाचा नारा असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
नाशिक शहरात गतवेळी भाजपची महापालिकेत सत्ता होती. शिवाय, शहरातील तीनही आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे भाजप सर्वात मोठा भाऊ असण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी जागांची विभागणी होऊ शकते. तुलनेत ग्रामीण क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष भाजपपेक्षा वरचढ आहे. या पक्षाचे सात आमदार अस्तित्वात आहेत. दुसरीकडे दोन आमदार असलेत तरी शिवसेनेची ग्रामीण भागातील ताकद मर्यादित आहे. उद्याच्या निवडणुका स्वबळावर लढल्या गेल्या तर अनेक ठिकाणी भाजप- राष्ट्रवादी कॉंग्रेस असा तर मालेगाव, नांदगाव तालुक्यांत भाजप- शिवसेना असा मुकाबला होणे अपरिहार्य असणार आहे. जिल्ह्यात ११ ठिकाणी झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुक निकालाचा प्रभावही महायुतीच्या आगामी वर्चस्वावर परिणाम करू शकतो.
‘मविआ’ची नांगी की उभारी ?
दरम्यान, नगरपरिषद, नगरपंचायतीं निवडणुकीत अपवाद वगळता अनेक ठिकाणी विरोधी महाविकास आघाडीचा बोलबाला दिसलाच नाही. किमान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत तरी विरोधक मरगळ झटकतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि शिवसेना ( उबाठा ) हे पक्ष थोडेफार अस्तित्व राखून आहेत, तथापि कॉंग्रेसची अवस्था दयनीय आहे.
मालेगावी एमआयएमची प्रतिष्ठा पणाला..
मालेगाव महापालिका मुस्लीमबहुल क्षेत्रात येत असल्याने इथे महायुतीला विशिष्ट प्रभाग वगळता इतरत्र उमेदवार मिळणेही मुश्कील राहणार आहे. ‘एमआयएम’चे मौलाना मुफ्ती मालेगाव मध्याचे आमदार म्हणून सलग दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत आहेत. म्हणूनच महापालिका निवडणुकीत या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. समाजवादी पक्ष, मुस्लीम लीग आणि स्थानिक आघाड्या कितपत प्रभावी ठरतात, यावर येथील निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.
Comments are closed.