- पर्यावरणप्रेमींच्या आरोपाने नव्या वादाची चिन्हे
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
महापालिका प्रशासनाने पंचवटीतील रामटेकडी नजीक नवीन एसटीपी प्लांट उभारणीसाठी सुमारे ३०० झाडांवर कुऱ्हाड चालवल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तोडलेली झाडे लपवण्यासाठी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडण्यात आल्याचा दावाही करण्यात आल्याने नव्या वादाला फोडणी मिळणार असल्याची चिन्हे आहेत.
नाशिकच्या तपोवनात अगग्मी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे १८०० हून अधिक वृक्षांची कत्तल करण्याचा घाट घातला जात आहे. या मुद्द्यावर उभ्या राज्यभर रान पेटले आहे. या पार्श्वभूमीवर एसटीपी प्लांट उभारणीसाठी झाडे तोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार, तोडण्यात आलेल्या झाडांवर क्रमांक देखील टाकण्यात आले होते. तोडलेली झाडे लपवण्यासाठी मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून यावर खुलासा करताना दोन हरकतदारांची समजूत काढण्यात आल्याचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा हास्यास्पद असल्याचे पर्यावरणप्रेमींनी म्हटले आहे.
सदर वृक्षांची कत्तल करण्यात आल्याची माहिती वस्तुस्थितीवर आधारित असून तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर असताना पालिका प्रशासनाचा हा निर्णय निषेधार्ह असल्यची प्रतिक्रिया ज्येष्ठ पर्यावरणवाडी देवांग जानी यांनी व्यक्त केली. याप्रकरणी आम्ही जाब विचारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Comments are closed.