NGN News
Latest Marathi News

कोटक सिक्युरिटीजचा २०२६ करता बाजाराबाबत दृष्टिकोन जाहीर

  • जागतिक अस्थिरतेतही समभाग बळकट, तर सोन्याची चमक कायम राहणार

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

कोटक सिक्युरिटीज लिमिटेड (“कोटक निओ”) ने २०२६ मधील शेअरबाजाराच्या वाटचालीबाबतचा ‘मार्केट आउटलुक २०२६’  हा अहवाल आज प्रसिध्द केला. जागतिक पातळीवर अनिश्चितता राहणार असली तरी भारतीय शेअरबाजार आणि आणि कमोडिटी क्षेत्र चांगली कामगिरी करण्याचा आशावाद या अहवालात व्यक्त करण्यात आलेला आहे.

आगामी वर्षात गुंतवणूकदारांनी बारकाईने लक्ष ठेवावेत असे ढोबळ आर्थिक पातळीवरील प्रमुख प्रवाह (मॅक्रो ट्रेंड), क्षेत्रनिहाय निर्माण होऊ शकणाऱ्या संधी आणि कमोडिटी क्षेत्रातील प्रवाह याबाबत या अहवालात प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे.अहवालाच्या अनावरणप्रसंगी बोलताना कोटक सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ श्रीपाल शाह म्हणाले, “जागतिक अस्थिरतेतही भारत विकासाचा लखलखणारा दिवा राहणार आहे. कंपन्यांचे उत्पन्न भरभक्कम राहण्याचा अंदाज आणि सरकारच्या धोरणात्मक पाठबळ या दोन घटकांमुळे समभागांबाबत आमचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आणि उत्साहवर्धक आहे. २०२६ मध्ये सोने गुंतवणूकीसाठी सुरक्षित मालमत्ता म्हणून आपली चमक कायम राखण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर तरुण गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागामुळे शेअरबाजार अधिकाधिक विस्तारेल आणि   संपत्ती निर्मितीसाठी तो सज्ज आहे.” गुंतवणूक उद्योगाच्या बाबतीत भाष्य करताना ते पुढे म्हणाले, “सेबीने नुकतेच केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार ६३ टक्के कुटुंबांना शेअरबाजारातील किमान एका तरी गुंतवणूक योजनेबाबत माहिती आहे. परंतु केवळ ९.५ टक्के कुटुंबे शेअरबाजारात गुंतवणूकीबाबत सक्रिय आहेत. यातून भारताच्या शेअर बाजारात वाढीची प्रचंड क्षमता दडली असल्याचे स्पष्ट होते. गुंतवणूक अधिकाधिक सर्वसमावेशक आणि सुलभ करण्यासाठी ब्रोकरेज कंपन्यांनी पुढाकार घेणे अतिशय आवश्यक आहे.”कोटक सिक्युरिटीज मार्केट आउटलुक २०२६ अहवालात पुढील वर्षासाठी नमूद करण्यात आलेले प्रमुख प्रवाह आणि त्यांच्या परिणामांची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे.

सप्टेंबर २०२४ मध्ये भारतीय शेअरबाजाराने उच्चांकी पातळी गाठल्यानंतर १७ टक्क्यांची घट झाली होती, परंतु २०२५ च्या अखेरीस निफ्टी फिफ्टीने पुन्हा नवीन सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. या काळात लार्ज-कॅप्समध्ये वाढ दिसून आली, तर मिड-कॅप्स आणि स्मॉल-कॅप्समध्ये घसरण झाली; ऑटोमोबाईल,बँकिंग आणि धातू क्षेत्रांनी उत्कृष्ट कामगिरी केली, तर आयटी आणि एफएमसीजी क्षेत्र कमकुवत राहिले. विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्याने पैसे काढून घेतले असतानाही स्थानिक गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीमुळे बाजारातील स्थैर्य आणि विश्वास टिकून राहिला, तसेच प्राथमिक बाजारातील मजबूत उलाढालीतून गुंतवणूकदारांचा आशावाद अधोरेखित झाला. निफ्टीच्या कमाईबाबत धारणा अधिक बळकट झाली असून आर्थिक वर्ष २७ मध्ये १७.६टक्के आणि आर्थिक वर्ष २८ मध्ये १४.८ टक्के नफा वाढीचा अंदाज आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत निफ्टी २९,१२० अंशांवर पोहोचू शकतो (आर्थिक वर्ष २८  च्या ₹१,४५६ ईपीएस वर २० पट पी/ई), तेजीच्या परिस्थितीत ३२,०३२ अंशांचे लक्ष्य (२२ पट पी/ई) तर मंदीच्या स्थितीत २६,२०८ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता (१८ पट पी/ई) व्यक्त केली आहे. चालू वर्ष २६ साठी पसंतीची क्षेत्रे बीएफएसआय, तंत्रज्ञान, हेल्थकेअर आणि हॉस्पिटॅलिटी अशी आहेत. कमोडिटीजमध्ये, २०२५ मध्ये सोन्याने प्रचंड अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि जागतिक मध्यवर्ती बँकांच्या खरेदीमुळे प्रति औंस ४,००० डॉलरचा टप्पा ओलांडत ५५% पेक्षा जास्त वाढ नोंदवली, तर रुपयाच्या घसरणीमुळे भारतात सोन्याच्या किंमती ६०% वाढल्या. चांदीनेही सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी आणि पुरवठ्यातील कमतरता यामुळे १००% वाढ नोंदवली. भू-राजकीय तणाव आणि अधिशेष पुरवठ्यामुळे कच्च्या तेलात १९% घट झाली असल्याने २०२६ मध्ये सावधगिरी आवश्यक आहे; तांबे आणि अॅल्युमिनियमसारख्या मूलभूत धातूंचे दर वाढत्या विद्युतीकरणाच्या मागणी आणि पुरवठ्यातील आव्हानांमुळे स्थिर पण अस्थिरतेसह राहिले.

Comments are closed.