- लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड आदींचा समावेश
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्प उभारणीपोटी 1800 झाडांवर कुऱ्हाड मारली जाणार आहे. या चर्चेने अवघे नाशिककर वृक्षप्रेमी संतप्त झाले असताना कुंभमंत्री गिरीश महाजन यांनी त्यावर तोडगा म्हणून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 15 हजार वृक्ष लागवड केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या झाडांची योग्य प्रकारे देखभाल करण्याचे आश्वासन देखील यांनी दिले आहे.
दरम्यान, ही झाडे दक्षिण भारतातील राजमुद्री येथून आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः राजमुद्री येथे जाऊन 15 फूट उंचीची सुमारे 15 हजार देशी झाडे लिंब, जांभूळ, आंबा, पिंपळ, वड आदींची निवड केली आहे. ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करून नाशिक महापालिका उद्यान विभागाच्या माध्यमातून झाडाची देखभाल केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एक ते दोन हजार झाडे येत्या आठवड्यात शहरात दाखल होणार आहेत. साधूग्रामच्या जागेवरील एक्झीबिशन सेंटरचे टेंडर रद्द केल्यानंतर आता वृक्ष लागवडीचा निर्णय सरकारने घेतला आहे. नाशिक शहरात आधी 15 हजार वृक्ष लागवड करणार त्यानंतरच साधूग्रामच्या उभारणीसाठी तपोवनातील झाडांना हात लावणार, त्यातील बहुतांश झाडांचे पुनर्रोपण करणार, अशी भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केली आहे.
वाढत्या विरोधावर चर्चेचा उतारा..
तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची ढग वाढली आहे. वृक्षप्रेमी नागरिकांसोबत आता विविध राजकीय पक्ष, कलाकार यांनीही या निर्णयाच्या विरोधात शड्डू ठोकले आहे. या संदर्भात महापालिका प्रशासन उद्या आंदोलकांशी चर्चा करणार आहे. आंदोलकांना अधिकृतपणे चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. साधूग्राम उभारण्यासाठी काही झाडे काढावी लागतील, या प्रशासनाच्या भूमिकेनंतर आंदोलन तीव्र झाले आहे. दरम्यान, त्याच भागातील एक्झिबिशन सेंटर प्रकल्पालाही स्थगिती देण्यात आली असून या डोममध्ये कुंभमेळ्यात साधू-महंतांची व्यवस्था करण्यात येणार होती. कुंभमेळ्यानंतर याच डोमचे एक्झिबिशन सेंटरमध्ये रूपांतर होणार होते.
Comments are closed.