NGN News
Latest Marathi News

आरोग्य विज्ञान विद्यापीठ : विद्यार्थी शुल्क रक्कम स्वतःच्या खात्यात जमा

कक्षाधिकाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

बनावट पावत्या तयार करून विद्यार्थ्यांकडून घेतलेली विशिष्ट शुल्काची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कक्षाधिकारी विजय जोंधळे, वरिष्ठ लिपिक सुरेंद्र रोकडे आणि शिपाई अर्चना निकम अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी संगनमताने सुमारे दीड कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका विद्यापीठ प्रशासनाने ठेवला आहे.

यासंदर्भात विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही संशयित परीक्षा विभागात कार्यरत असताना सप्टेंबर २०२३ पूर्वीपासून हा प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या पडताळणीपोटी विशिष्ट शुल्क आकारले जाते. ते शुल्क विद्यापीठाच्या खात्यात जमा करणे आवश्यक असताना संशयितांनी ते स्वतःच्या बँक खात्यात जमा करवून घेतले. ही एकत्रित रक्कम एक कोटी ५३ लाख इतकी असल्याचे तपासणीत आढळून आले. यासाठी बनावट पावत्या तयार करण्यात आल्या. अपहार केलेल्या रकमेपैकी निम्मी रक्कम वसूल करण्यात आली. मात्र उर्वरित वसूल होत नसल्याने विद्यापीठ प्रशासनाने कारवाईची बडगा उगारला.

कक्षाधिकारी निलंबित, दोघे अद्याप सेवेत?

दरम्यान, शुल्क रक्कम अपहार प्रकरणी कक्षाधिकारी विजय जोंधळे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. तथापि, वरिष्ठ लिपिक सुरेंद्र रोकडे आणि शिपाई अर्चना निकम हे संशयित अजूनही सेवेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठ त्यांच्यावर कारवाई करते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments are closed.