NGN News
Latest Marathi News

तपोवनात ‘माईस हब’ उभारणीचा घाट, वृक्ष प्रेमींमध्ये संतापाची लाट

  • पालिकेला चिंता उत्पन्नाची, जनसामान्यांना पर्यावरण रक्षणाची

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

पंचवटीच्या तपोवनात साधुग्राम उभारणीच्या नावाखाली तब्बल १८२५ वृक्षांची कत्तल करण्याचा प्रशासनाचा हेतू अवघ्या नाशिककरांच्या संतापाचा मुद्दा बनलेला असताना आता येथील ३५ एकर क्षेत्रावर पक्के बांधकाम करून कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र ( माईस हब ) तयार करण्याचा प्रशासनाच्या वतीने घाट घातला जात आहे. सदर प्रकल्प उभारणीपोटी महापालिकेकडून २२० कोटींच्या निविदा काढल्याच्या वृत्ताने वृक्ष प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रस्तावित निर्णयामुळे पालिका प्रशासन-वृक्षप्रेमी यांच्यातील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता गडद झाली आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा काही महिन्यांवर येवून ठेपलेला असताना दरवेळी बाहेरून येणाऱ्या साधू-महंतांसाठी निवासाची व्यवस्था तपोवनात साधुग्राम उभारणीतून करण्यात येते. यावेळी ती तशी करताना त्या परिसरातील १८२५ वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाची वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटून त्याविरुद्ध आंदोलनाचे शस्त्र उपसण्यात आले. या मुद्द्यावर आयोजित जन सुनावणीत वृक्षतोड निर्णयाला एकमुखी विरोध करण्यात आला. भरीस भर प्रशासनाने सार्वजिक-खासगी भागीदारी अर्थात ‘पीपीपी’ तत्वावर २२० कोटी रुपये खर्चून माईस हब तयार करण्यासाठी निविदा जारी केल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत ३५ एकर क्षेत्रावर कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारण्याचा आणि त्यामधून कुंभमेळा व्यतिरिक्त काळात अर्थार्जन करण्याचा प्रशासनाचा उद्देश आहे. प्रशासकीय सूत्रांनुसार, माईस हबद्वारा पालिकेला दरवर्षी चार ते पाच कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते.

तथापि, महापालिकेचा हा निर्णय म्हणजे तपोवनातील वृक्षराजी नष्ट करून येथील हिरव्या सौंदर्यावर कुऱ्हाड चालवण्यासम असल्याची संतप्त भावना वृक्ष प्रेमींमध्ये उमटली आहे. नाशिकच्या पर्यावरण संतुलनावर हा घाला असून प्रदर्शन आयोजनातून प्रदूषण वाढीला निमंत्रण देण्याचे ते बीजारोपण असेल. आधीच विविध कारणांमुळे शहरातील प्रदूषण वाढत असल्याचे हवा गुणवत्ता निर्देशांक ( एक्यूआय ) वेळोवेळी निर्देशित करत असतो. म्हणूनच प्रशासनाने असा विपरीत निर्णय घेवू नये, असा सूर वृक्ष प्रेमींमधून उमटत आहे. आता प्रशासन आपला निर्णय रेटते की वृक्षप्रेमी लढ्याद्वारे निर्णय मागे घ्यावयास भाग पडतात, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहणार आहे.


@ ‘माईस हब’ सारखा व्यावसायिक उपक्रम उभारून महापालिका प्रशासनाला साधुग्राम विक्रीला काढायचा आहे का, अशी शंका येते. या प्रकल्पातून अनेक कमर्शियल उपक्रम राबवण्याचा प्रशासनाचा इरादा स्पष्ट आहे. महापालिकेला अर्थार्जन महत्वाचे वाटते, मात्र साधुग्रामचे अस्तित्व धोक्यात आणून प्रशासनाला नेमके काय साधायचे आहे. दुसरे म्हणजे, ‘माईस हब’ उभारण्यासाठी महापालिका क्षेत्रात इतर अनेक पर्याय असताना यांना तपोवनच का हवे, हा यक्षप्रश्न आहे, वृक्षतोड न करता असा प्रकल्प झाल्यास आणि प्रदूषण होणार नसल्याची खात्री मिळाल्यास आमचा त्यास विरोध असण्याचे कारण नाही .

देवांग जानी, अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती, नाशिक

@ तपोवनात सुमारे ९० एकर क्षेत्र आरक्षित आहे. ‘माईस हब’ उभारण्याचे प्रस्तावित आहे, ही वस्तुस्थिती असली तरी त्यासाठी वृक्षतोड करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. वृक्ष नसलेल्या ठिकाणी जागेचे सपाटीकरण करून हा प्रकल्प होणार आहे. त्यासाठी सिमेंटचा वापर न करता जर्मन हंगर च्या धर्तीवर तंबू वापरण्यात येतील. विशेष म्हणजे या तंबूचा वापर साधू-महंतांच्या निवासासाठी करण्यात येईल. याद्वारे कोणतेही प्रदूषण होणार नाही, शिवाय महापालिकेला दरवर्षी त्यामधून कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळेल. पर्यावरणस्नेहीपण जपून हा प्रकल्प निर्माण होणार आहे. याबाबतचे गैरसमज दूर करण्यात येतील.

मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महापालिका

Comments are closed.