दादांच्या ‘राष्ट्रवादी’ कडून मंत्री कोकाटे यांना चाल तर शिंदेसेनेचे आ. कांदे यांना बळ
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीमध्ये तूर्तास शुकशुकाट जाणवत असला तरी सत्ताधारी महायुतीने ही निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे एकूण हालचालींवरून दिसून येत आहे. महायुतीचे बिनीचे नेते निवडणूक एकत्र लढली जाण्याचा ढोल वाजवत असले तरी कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेता तीनही महत्वपूर्ण घटकपक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता बळावली आहे. भाजपने निवडणुकीची केव्हाच तयारी सुरु केलेली असताना आता राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेना या पक्षांनीही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसल्याचे घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. अशातच निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहू पाहणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांना स्वपक्षासह शिंदेसेनेने घेरण्याचा चंग बांधला आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचे संपर्कमंत्रिपद बहाल करणे आणि शिंदेसेनेने भुजबळ यांचे कडवट विरोधक आ. सुहास कांदे यांची जिल्हा संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यातून हा मुद्दा अधोरेखित झाला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या शहरी भागात भाजपचे तर ग्रामीण भागात राष्ट्रवादी अजित पवार पक्ष वर्चस्व राखून आहे. जिल्ह्यात अनुक्रमे पाच आणि सात आमदार या पक्षांचे तर दोघे शिंदेसेनेचे आहेत. संख्याबळ लक्षात घेता जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा असला तरी नेत्यांमध्ये एकजिनसीपण नसल्याचे आणि चारपैकी तीन मंत्री राष्ट्रवादीचे असले त्यांच्यात ताळमेळ नसल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. भुजबळ यांचे ज्येष्ठत्व आणि आक्रमकता पाहता ते जिल्ह्यातील उर्वरित तीनही मंत्र्यांना ‘ज्युनिअर’ समजून जवळ करत नाहीत. पक्षाच्या उर्वरित आमदारांशीही त्यांचे सख्य नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षण आंदोलनात ओबोसींची बाजू घेत मनोज जरांगे यांच्याविरुद्ध ठोकलेला शड्डू भुजबळ यांचे पक्षातील वजन घटवण्यास पूरक मुद्दा ठरला आहे. जिल्ह्यात बहुसंख्येने असलेल्या मराठा मतदानावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, याची पक्षाध्यक्षांन पुरती जाण आहे. याच कारणातून भुजबळ यांनी केवळ येवल्याचा गड सांभाळावा आणि इतर निर्णय कोकाटे यांनी घ्यावेत, अशी अप्रत्यक्ष व्यवस्थाच अजित पवारांनी कोकाटे यांच्या नियुक्तीतून केल्याचे मानले जात आहे.
आ. कांदेंच्या नियुक्तीमागे जातीय समीकरण
जिल्ह्यात शिंदेसेनेचे दोन आमदार आहेत. त्यापैकी एक मालेगावचे दादा भुसे हे कॅबिनेट मंत्रीपदी विराजित आहेत, तर सुहास कांदे नांदगावचे प्रतिनिधित्व करतात. जिल्हा राजकारणात भुजबळ-कांदे यांच्यातील हाडवैर सर्वश्रुत आहे. नांदगावमध्ये कांदे यांनी भुजबळ यांचे पुतणे समीर यांचा पाडाव करून दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. जिल्ह्यात मराठा समाजानंतर प्राबल्य असलेल्या वंजारी समाजाचा चेहरा म्हणून कांदे परिचित आहेत. भुजबळ हा ओबीसी चेहरा असला तरी वंजारी समाज त्यांच्या फार प्रभावाखाली नाही. हा मुद्दा हेरूनच शिंदेसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आ. कांदे यांना जिल्हा संघटन प्रमुखपद दिल्याचे बोलले जाते. भुजबळ यांच्या येवल्यात वंजारी समाज संख्येने चांगला असल्याने तिथेही कांदे निर्णायक भूमिकेत येवू शकतात, अशी पक्षाची रणनीती आहे.
स्वपक्षीय आमदारांनाही भुजबळ नकोत ?
महायुती सत्तेमध्ये आली तेव्हा जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून भुजबळ यांचे नाव पहिल्या यादीत असेल, असे वाटत असताना त्यांच्या नावावर फुली मारून अजित पवारांनी माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रीपदी बसवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. पक्षातील इतर सहाही आमदारांनी भुजबळ यांच्या नावाला तेव्हा विरोध दर्शवल्याची माहिती अंतस्त गोटातून पुढे आली होती. नंतर धोरणात्मक बाब म्हणून भुजबळ मंत्रीमंडळात आलेत. मात्र, त्यांच्याबद्दलच्या आमदारांच्या भूमिकेत बदल झाला नसल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच त्यांच्याऐवजी कोकाटे यांना पक्षाचे संपर्कमंत्री नेमल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.
Comments are closed.