NGN News
Latest Marathi News

नाशिक विभागातील १५.८० लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १४७४ कोटीं

राज्य सरकारच्या घोषणेने दिलासा; सर्वाधिक ८४६ कोटी अहिल्यानगरला

नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क

गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या घोषणेने दिलासा मिळाला आहे. त्यानुसार, नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी सरकारने १४७४ कोटींची मदत जाहीर केली आहे. विभागात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १५.८० लाखांच्या घरात आहे.

राज्य सरकारने अशी मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली जाईल, अशी घोषणा केली होती. स्वाभाविकच, सरकारच्या प्रत्यक्ष मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नाशिक विभागात साडेअकरा लाख हेक्टर क्षेत्रांवरील पिकांवर अतिवृष्टीने घाला घातला होता. यासंदर्भात कृषी विभागाने पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सरकारने शनिवारी सकाळी मदतीचे आदेश निर्गमित केले. नाशिक विभागात नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. उपरोक्त मदतीपैकी नाशिक जिल्ह्याला ३१७ कोटी, जळगावला २९९ कोटी, धुळ्याला दहा कोटी, नंदुरबारला ५३ लाख आणि सर्वाधिक नुकसान झालेल्या अहिल्यानगरला ८४६ कोटी रुपयांची प्रत्यक्ष मदत प्राप्त होणार आहे.

Comments are closed.